भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवनसाठी सध्या खूप कठीण काळ सुरू असल्याचे दिसून येत आहे. पहिल्या दोन्ही सामन्यांत निराशाजनक कामगिरी केल्यानंतर आता तिसऱया आणि शेवटच्या सामन्यासाठी भारतीय संघ कोलकात्याला दाखल होताच शिखर धवन विमानतळावरून थेट अपोलो रुग्णालयाकडे रवाना झाला. रुग्णालयात पोहोचल्यानंतर तो काही वेळाने हॉटेलकडे रवाना देखील झाला पण धवनच्या दुखापतीबाबत कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही. आयएएनएसने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय संघ कोलकाताच्या नेताजी सुभाषचंद्र बोस विमानतळावर दाखल होताच संघासोबत हॉटेलच्या दिशेने रवाना होण्याऐवजी शिखर धवन अपोलो रुग्णालयाकडे रवाना झाला. रुग्णालयाच्या अधिकाऱयांनीही या वृत्ताला दुजोरा दिला. पण धवनच्या दुखापतीबाबत कोणतीही माहिती देऊ शकत नाही, असे रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे. संघ व्यवस्थापनानेच तशी रुग्णालयाकडे विनंती केल्याचे समजते. शिखर धवनच्या दुखापतीबाबत अधिक माहिती आम्ही देऊ शकत नाही. तो केवळ नियमित तपासणीसाठी येऊन गेला, असे रुग्णालयातील अधिकाऱयाने सांगितले.

 

शिखर धवन याआधी दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेला मुकला होता. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत देखील तो खेळू शकला नाही. नेटमध्ये सराव करताना त्याच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या सुरूवातीच्या कसोटी सामन्यांसाठी त्याचा विचार केला गेला नाही. सध्याच्या वनडे मालिकेत देखील धवनने निराशाजनक कामगिरी केली. पहिल्या सामन्यात धवनने केवळ १ धाव केली तर दुसऱया सामन्यात तो १५ धावा करून बाद झाला. शिखर धवनच्या दुखापतीचा विचार करता तिसऱया आणि शेवटच्या वनडेसाठी धवनच्या जागी संघात अजिंक्य रहाणेचा समावेश केला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. रहाणेने नुकतेच इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यात ९१ धावांची खेळी साकारली होती. या सामन्यात रहाणे संघाचे नेतृत्त्व करत होता.