क्रिकेट संघटनांवर क्रिकेटपटू असायला हवेत, याबाबत चर्वितचर्वण होत असतानाच शिवाजी पार्क जिमखानाच्या त्रवार्षिक निवडणुकीमध्ये भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर आणि माजी क्रिकेटपटू प्रवीण अमरे अध्यक्षपदासाठी एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.
गेली तीन वर्षे अमरे यांनी अध्यक्षपद भूषवले असून ते कामत-अमरे पॅनलकडून उभे आहेत. तर दुसरीकडे हेगडे-पोवळे पॅनलकडून वाडेकर उभे आहेत. काही वर्षांपूर्वी माजी नगरपाल जगन्नाथ हेगडे यांनी वाडेकर यांना पराभूत केले होते, पण या वेळी त्यांच्याच पॅनेलमधून वाडेकर यांना अध्यक्षपदासाठी उभे करण्यात आले आहे. तर खानोलकर-मूरकर पॅनेलकडून या वेळी अ‍ॅड. श्यामराव देशमुख उभे आहेत. त्याचबरोबर क्रिकेट सचिवपदासाठी पद्माकर शिवलकर आणि श्रेयस खानोलकर या माजी क्रिकेटपटूंमध्ये स्पर्धा होणार आहे. सरचिटणीसपदासाठी चौरंगी लढत पाहायला मिळणार असून यासाठी संजीव खानोलकर, संतोष पोवळे, प्रदीप शिरगावकर आणि दिलीप कुलकर्णी रिंगणात आहेत.