सन्मित्र मंडळ, देवगड आयोजित राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत शिवशक्ती, मुंबई पोलीस जिमखाना, एअर इंडिया, महाराष्ट्र पोलीस, बँक ऑफ इंडिया यांनी आगेकूच केली. महिलांच्या गटात मुंबई पोलीस जिमखान्याने सिंधुदुर्ग गर्ल्सचा ३२-२४ असा पराभव केला.
दुसऱ्या सामन्यात मुंबई उपनगरच्या सावित्रीबाई संघाने सिंधुदुर्ग गर्ल्सवर १५-१३ असा विजय मिळवला. अंजली रोकडे या विजयात चमकली. शिवशक्तीने शिवाजी उदयला २५-१५ असे नमवले. सुवर्णा बारटक्के, गौरी वाडेकर यांनी शिवशक्तीच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
पुरुषांच्या गटात एअर इंडियाने मराठा ली संघाचा २४-१३ असा पराभव केला. मुंबई पोलीस आणि बँक ऑफ इंडिया ही लढत बरोबरीत सुटली. तर चुरशीच्या लढतीत स्पाने पोस्टल ड्रॉवर ३२-३० अशी मात केली. महाराष्ट्र पोलिसांनी कोकण दूध संघाचा २३-५ असा धुव्वा उडवला. ठाणे पोलिसांनी देना बँकेवर ३५-१० अशी मात केली.