क्रिकेटपटू आणि त्यांचं इंग्रजी हा सध्या चर्चेचा विषय झाला आहे. माजी क्रिकेटपटू सध्या मैदानाबाहेर ट्विटरवर जोरदार फलंदाजी करत असून त्यांच्या इंग्रजीतील चूका समोर आल्याने क्रिकेटपटू आणि त्यांचं इंग्रजी हा ट्विटरवर ट्रेण्डिंग विषय बनला आहे. नुकतेक गेल्या काही दिवसांपासून भारतीय संघाचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग आणि ब्रिटीश पत्रकार पीयर्स मॉर्गन यांच्यातील ट्विटवर रंगलेला सामना ट्विटरकरांना पाहायला मिळाला. त्यापाठोपाठ आता पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याच्या ट्विटलाही ट्विटरकरांनी निशाण्यावर घेतले आहे. शोएब अख्तरने केलेल्या एका ट्विटमध्ये झालेल्या इंग्रजीच्या चुकांमुळे ट्विटरकरांनी त्याची खिल्ली उडवली.

‘रावळपिंडी एक्स्प्रेस’ अशी ओळख असेलल्या शोएबने सोमवारी सामनिया बैग या पाकिस्तानी महिला गिर्यारोहकाची भेट घेतल्यानंतर एक ट्विट केले होते. शोएबने आपल्या ट्विटमध्ये सामनियाची भेट घेण्याचा योग जुळून आल्याचा आनंद व्यक्त केला. पण त्याने आपल्या ट्विटमध्ये इंग्रजीच्या चुका केल्या. ट्विटरकरांनी शोएबच्या याच चुकांवरून त्याला लक्ष्य केले. काही ट्विटरकांनी शोएबला इंग्रजी ऐवजी ऊर्दुमध्येच ट्विट करण्याचा सल्ला दिला. तर काहींनी शोएबला ‘रॅपिड इंग्लिश स्पिकिंग कोर्स’चे पुस्तक दिवाळी भेट म्हणून देऊ केले आहे.

ट्विटरकरांनी टीका करण्यास सुरूवात केल्याचे लक्षात आल्यानंतर शोएबने आपले ट्विट डीलीट देखील केले. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. अनेकांनी शोएबच्या इंग्रजी ज्ञानाची खिल्ली उडवून त्याला अनेक सल्ले देऊ केले होते.

शोएबने यानंतर सावधगिरी बाळगून पुन्हा एकदा सामनियासोबतचे छायाचित्र असलेले ट्विट केले. यावेळी शोएबने अगदी सोप्या शब्दांत आपले म्हणणे मांडले.