पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिक याला ट्विटरकरांच्या रोषाला सामोरे जावे लागले. आपल्या चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं देताना एका प्रश्नाच्या उत्तरात शोएब मलिकने टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याच्या धर्माचा उल्लेख केला. याचाच फटका मलिकला बसला. ट्विटरकरांनी मोहम्मद शमीच्या धर्माचा उल्लेख केल्यावरून मलिकला चांगलच फटकारलं. ‘करायला गेलो एक आणि झालं भलतंच’, अशीच काहीशी गत शोएब मलिकसोबत झाली. शोएब मलिक आपल्या चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरं देत होता. भारतीय संघातील तुझा आवडता गोलंदाज कोण? असा प्रश्न एकाने मलिकला विचारला. त्यावर मलिकने मोहम्मद शमीचं नाव घेतलं. पण त्यासोबत तो मुस्लिम असल्याचा उल्लेख केल्याचं नेटिझन्सच्या काही पचनी पडलं नाही.

”भारतीय संघातील मोहम्मद शमी हा सर्वोत्कृष्ट गोलंदाज आहे. तो मुस्लिम आहे म्हणून मी त्याचं नाव घेतोय असं नाही, पण तो खरंच खूप चांगला गोलंदाज आहे. त्याच्या विरुद्ध फलंदाजी करणं मला कठीण जातं.”, असं शोएब मलिक म्हणाला. यावर ट्विटरकरांनी शोएब मलिकने शमीच्या धर्माचा येथे उल्लेख करण्याची काहीच गरज नव्हती असं मत नोंदवलं.

तुमचा आवडत्या खेळाडूबद्दल माहिती देताना त्याच्या धर्माचा उल्लेख करणं महत्त्वाचं नव्हतं, असं एका ट्विटरकराने म्हटलं आहे. तर एकाने शमी मुस्लिमनसून भारतीय आहे, असं राहुल सिन्हा याने सुनावलं आहे. शमीची माहिती देताना त्याच्या धर्माबद्दल उल्लेख करण्याची गरजच काय? असा सवाल ट्विटरकरांनी मलिकला यावेळी विचारला.

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघाविरुद्ध पाकने आजवर चांगली कामगिरी केली असल्याचंही तो म्हणाला. इतर स्पर्धांमध्ये भारतीय संघाविरुद्ध चांगल्या कामगिरीची नोंद केलेली नसली तरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आमच्याकडून आजवर चांगली कामगिरी झाली आहे आणि यापुढेही ती कायम राहिल याची काळजी घेऊ, असं मलिक म्हणाला.