दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय क्रीडापटूंनी पदकांची लयलूट कायम राखत वर्चस्व गाजवले. या स्पर्धेत जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या नेमबाज चैन सिंगने सुवर्णपदकाची हॅट्ट्कि नोंदवली. ट्रायलथॉन मिश्र रिलेतही भारतीय अ‍ॅथलिट्सनी सुवर्णपदकावर कब्जा केला. सहा बॉक्सिंगपटूंनी अंतिम लढतीत आगेकूच करत पदक पक्के केले.

* नेमबाजी : चैन सिंगचे यश
रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या चैन सिंगने दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेतला अफलातून फॉर्म कायम राखताना सुवर्णपदकांची हॅट्ट्कि नोंदवली. ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात चैनने ४५३.३ गुणांसह अव्वल स्थान पटकावले. ४५०.३ गुणांसह गगन नारंगला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. चैनने याआधी स्पर्धेत ५० मीटर रायफल प्रोन आणि १० मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली होती. ऑलिम्पिक पदकप्राप्त नेमबाज गगन तिन्ही प्रकारात सहभागी झाला मात्र सुवर्णपदकाने त्याला हुलकावणी दिली. ५० मीटर रायफल थ्री पोझिशन सांघिक प्रकारात चैन सिंग, सुरेंद्र सिंग राठोड आणि गगन नारंग या त्रिकुटाने ३४९० गुणांसह सुवर्णपदकावर कब्जा केला. आतापर्यंत नेमबाजांनी या स्पर्धेत २१ सुवर्ण, ९ रौप्य आणि ८ कांस्यपदके पटकावली आहेत.

* ट्रायलथॉन : सोनेरी कामगिरी
ट्रायलथॉन मिश्र रिले प्रकारात अव्वल स्थानासह भारतीय खेळाडूंनी आणखी एका सुवर्णपदकाची कमाई केली. पल्लवी रेतीवाला, दिलीप कुमार, थौडम सरोजिनी देवी आणि धीरज सावंत या चौकडीने १ तास, २४ मिनिटे आणि ३१ सेकंदात शर्यत पूर्ण केली. मिश्र रिले शर्यतीत ३०० मीटर जलतरण, ६० किमी सायकलिंग आणि १.२ धावणे यांचा समावेश होता. दिलीप आणि पल्लवी यांनी वैयक्तिक प्रकारातही सुवर्णपदक पटकावले होते. ट्रायथलॉन प्रकारातील तिन्ही सुवर्णपदकांवर नाव कोरत भारताने निर्भेळ यश मिळवले.

* बॉक्सिंग : सहा पदके पक्की
ऑलिम्पिक पदकविजेत्या मेरी कोमसह अन्य भारतीय बॉक्सिंगपटूंनी आपापल्या वजनी गटात अंतिम लढतीत धडक मारत पदक पक्के केले. दुखापतीनंतर पुनरागमन करणाऱ्या मेरी कोमला ५१ किलो वजनी गटात तांत्रिक कारणास्तव अवघ्या ४० सेकंदात विजयी घोषित करण्यात आले. पुरुषांमध्ये एल. देवेंद्रो सिंगने ४९ किलो वजनी गटात थिवाना राणासिंगेवर २९-२८ असा निसटता विजय मिळवला. ५६ किलो वजनी गटात शिवा थापाने बांगलादेशच्या मोहम्मद ओहिडुझमनचा ३-० असा धुव्वा उडवला. विकास कृष्णनने ७५ किलो वजनी गटात अफगाणिस्तानच्या फोलाद वाली शाहवर ३-० अशी सहज मात केली. मनोज कुमारने ६४ किलो वजनी गटातून खेळताना भूतानच्या तेश्रिंग वांगचुकला ३-० असे नमवले.

* कबड्डी : भारत अंतिम फेरीत
भारताच्या पुरुष आणि महिला या दोन्ही कबड्डी संघांनी दिमाखात अंतिम फेरी गाठली आहे. भारताच्या महिलांनी नेपाळला ४५-१५ अशा फरकाने पराभूत केले. भारताकडून स्नेहल शिंदे, पायल चौधरी आणि प्रियांका यांनी अप्रतिम खेळ केला. अंतिम फेरीत भारतीय महिलांची बांगलादेशशी गाठ पडणार आहे. भारताच्या पुरुष संघाने उपांत्य फेरीत बांगलादेशचा २९-९ असा पराभव केला. बाजीराव झोडगे, सुरजित यांच्या भक्कम बचावाला रोहित कुमारच्या आक्रमक चढायांची सुरेख साथ मिळाली. अंतिम फेरीत पाकिस्तान-श्रीलंका लढतीतील विजेत्याशी भारताचा सामना होणार आहे.