ऑस्ट्रेलिया-भारत ‘अ’ यांच्यातील सराव सामना अनिर्णित

मुंबईचा युवा फलंदाज श्रेयस अय्यरच्या द्विशतकी झंझावाताचा तडाखा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी अनुभवला. त्याने रविवारी कारकीर्दीतील सर्वोत्तम अशी खेळी साकारून निवड समितीचे दार ठोठावले आहेत. ऑस्ट्रेलिया आणि भारत ‘अ’ यांच्यातील सराव सामना अनिर्णित अवस्थेत संपला. परंतु नॅथन लिऑन आणि स्टीव्ह ओ’कीफे यांना भारतीय फलंदाजांनी चांगलाच चोप दिला. परंतु या दोघांना मिळालेले एकंदर सात बळी ऑस्ट्रेलियासाठी आशादायी ठरू शकतील.

शनिवारी ८५ धावांवर नाबाद राहणाऱ्या अय्यरने रविवारी फक्त दहा मिनिटांत शतक पूर्ण केले. त्याने लिऑन आणि ओ’कीफे यांच्यावरच विशेष हल्ला चढवला. अय्यरने कृष्णप्पा गौतमसोबत सातव्या विकेटसाठी १३८ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. गौतमने १० चौकार आणि ४ षटकारांनिशी ६८ चेंडूंत ७४ धावा केल्या. अय्यर आणि गौतम यांनी सकाळच्या सत्रात स्थानिक क्रिकेटप्रमाणेच फटकेबाजी केली. अय्यरने लिऑनला चार उत्तुंग षटकार ठोकले.

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये नवव्यांदा शतकी वेस ओलांडणाऱ्या २२ वर्षीय अय्यरने जवळपास पाच तास किल्ला लढवत २७ चौकार आणि ७ षटकारांची आतषबाजी करीत नाबाद २०२ धावा केल्या. हैदराबाद येथे झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या सराव सामन्यातसुद्धा त्याने शतक झळकावले होते. अय्यरने ऑक्टोबर २०१५ मध्ये वानखेडे स्टेडियमवर पंजाबविरुद्ध २०० धावांची खेळी साकारली होती. ती वैयक्तिक धावसंख्या रविवारी मागे टाकली.

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ७ बाद ४६९ धावसंख्येवर डाव घोषित केला होता. या धावसंख्येला प्रत्युत्तर देताना भारत ‘अ’ संघाचा पहिला डाव ४०३ धावांत संपुष्टात आला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला ६६ धावांची आघाडी मिळाली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात ४ बाद ११० धावा केल्या. ओ’कीफे (१९) आणि मॅथ्यू वेड (६) हे दोघे नाबाद राहिले.

पुण्यात २३ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटीच्या पाश्र्वभूमीवर हा सराव सामना ऑस्ट्रेलियासाठी निराशाजनक ठरला आहे. सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला दोन्ही डावांत अनुक्रमे २५ आणि ३५ धावा करता आल्या. तर मॅट रेनशॉला अनुक्रमे ११ आणि १० धावा काढता आल्या आहेत. याशिवाय लिऑनने चार बळी घेताना १६२ धावा दिल्या, तर ओ’कीफेने तीन बळी घेताना १०१ धावा दिल्या.

संक्षिप्त धावफलक

ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : ७ बाद ४६९ डाव घोषित.

भारत ‘अ’ (पहिला डाव) : ९१.५ षटकांत सर्व बाद ४०३  (श्रेयस अय्यर नाबाद २०२, कृष्णप्पा गौतम ७४; नॅथन लिऑन ४/१६२, स्टीव्ह ओ’कीफे ३/१०१).

ऑस्ट्रेलिया (दुसरा डाव) : ३६ षटकांत ४ बाद ११० (पीटर हँड्सकोम्ब ३७, डेव्हिड वॉर्नर ३५; रिषभ पंत १/९).