मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पुरस्कार जाहीर

यंदाच्या रणजी हंगामात धावांची टांकसाळ उघडणारा गुणवान फलंदाज श्रेयस अय्यर आणि सातत्यपूर्ण प्रदर्शनाच्या बळावर भारतीय कसोटीत संघात निवड झालेला वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूर यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वार्षिक पुरस्कारांवर नाव कोरले. वांद्रे-कुर्ला संकुलातील शरद पवार इन्डोअर अकादमी येथे झालेल्या सोहळ्यात पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

२०१४-१५ मध्ये ८०९ तर २०१५-१६ मध्ये १३२१ धावांसह हंगामात सर्वाधिक धावांचा विक्रम नावावर करणाऱ्या श्रेयस अय्यरला एस. व्ही. राजाध्यक्ष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २०१४-१५ मध्ये ४८ तर २०१५-१६ मध्ये ४१ बळी घेणाऱ्या शार्दूल ठाकूरला शावक पाघडीवाला पुरस्काराने गौरवण्यात आले.

रणजी हंगामात जलद शतक झळकावण्याचा विक्रम करणाऱ्या श्रेयसला विशेष पुरस्कार देण्यात आला. २०१४-१५ हंगामात श्रेयसने ११७ चेंडूत १०० धावांची तर २०१५-१६ मध्ये ८१ चेंडूत १०० धावांची खेळी साकारली होती.

दोन्ही हंगामांसाठीचा सवरेत्कृष्ट क्रिकेटपटूसाठीच्या दत्तू फडकर पुरस्कारासाठी श्रेयसची निवड झाली. २०१४-१५ हंगामासाठी श्रेयसची वैयक्तिक तर २०१५-१६ हंगामासाठी श्रेयस आणि शार्दूल यांची संयुक्तपणे निवड झाली. ‘द जस्टिस तेंडुलकर’ पुरस्कारासाठी शार्दूल ठाकूरची (२०१४-१५) तर श्रेयस अय्यरची (२०१५-१६) निवड झाली.

२३ वर्षांखालील वयोगटात सवरेत्कृष्ट कामगिरीसाठी अखिल हेरवाडकर (२०१४-१५) आणि जय बिस्ता (२०१५-१६) यांची निवड झाली. ४१वे रणजी जेतेपद पटकावणाऱ्या मुंबई संघाचाही या वेळी गौरव करण्यात आला.

एमसीएतर्फे आयोजित वयोगट तसेच स्थानिक स्पर्धामध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या १६ खेळाडूंना शरद पवार कनिष्ठ शिष्यवृत्ती देण्यात आली.

 

अभिमन्यु व प्रियांक यांच्यात अंतिम लढत

क्रीडा प्रतिनिधी, पुणे</p>

मुंबईच्या अभिमन्यु गांधी व प्रियांक जयस्वाल या दोन्ही खेळाडूंमध्ये अखिल भारतीय स्नूकर स्पर्धेच्या विजेतेपदासाठी लढत होणार आहे. ही स्पर्धा पीवायसी हिंदू जिमखाना येथे आयोजित करण्यात आली आहे.

अभिमन्यु याने स्थानिक खेळाडू अभिजित रानडे याचा ६९-४४, ७६-४१, ७१-३७, ७२-३७ असा सरळ चार फ्रेम्समध्ये पराभव केला. या तुलनेत प्रियांक याला औरंगाबादच्या सलमान महंमद याच्याविरुद्ध विजय मिळविण्यासाठी झगडावे लागले. त्याने हा सामना ४६-८४, ५२-५१, ५५-३३, ६५-११, ६५-५९ असा जिंकला.