बंगालच्या कन्येकडून आज पदकाच्या अपेक्षा

शारीरिक तंदुरुस्ती आणि व्यायाम ही भारताची संस्कृतीच नाही. परंतु ती रुजवण्याचे ध्येय बाळगणाऱ्या पश्चिम बंगालच्या श्रेयशी दास चौधरीकडून जागतिक शरीरसौष्ठव अजिंक्यपद स्पध्रेतील महिलांच्या शारीरिक तंदुरुस्ती विभागात शुक्रवारी पदकाच्या विशेष अपेक्षा आहेत. टेबल टेनिस, योगा आणि आता शरीरसौष्ठव खेळात हिमतीने वावरणाऱ्या श्रेयशी वैशिष्टय़ म्हणजे तिचे चौधरी कुटुंब हे खेळासाठीच विशेष ओळखले जाते. तिचे वडील रणजित दास चौधरी हे माजी शरीरसौष्ठवपटू आणि राष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षक. तिचे आजोबा देवंजन दास चौधरी राष्ट्रीय टेबल टेनिसपटू, तर पणजोबा हेसुद्धा दर्जेदार शरीरसौष्ठवपटू होते. आपल्या घराण्याचा वारसा चालवणारी श्रेयशी त्यांच्या एक पाऊल पुढे जात जग जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे.

श्रेयशीचे खेळाशी नाते कसे जुळले, हे सांगताना रणजित दास यांच्या डोळ्यांमध्ये तिचा भूतकाळ तरळू लागला. ते म्हणाले, ‘‘दोन वर्षांची असल्यापासून श्रेयशीने खेळायला सुरुवात केली. मी एका क्लबला जिम्नॅस्टिक्सचे मार्गदर्शन करायचो. तिथे ती माझ्यासोबत यायची आणि बाकीच्यांचे पाहून तसे करायचा अवखळ प्रयत्न करायची. पाचव्या वर्षीपासून मी तिला तंत्रशुद्ध प्रशिक्षणाला प्रारंभ केला. बालपणी ती टेबल टेनिससुद्धा उत्तम खेळायची. परंतु कालांतराने योगासने आणि तालबद्ध जिम्नॅस्टिक्स या खेळांचे मी तिला प्रशिक्षण दिले. माझ्या मुलीने देशाला अभिमान वाटेल, असे काहीतरी करावे अशी माझी इच्छा होती.’’

रणजित दास यांच्या आजोबांनी महान शरीरसौष्ठवपटू मनोहर एच यांचे गुरू विष्णुचरण यांना व्यायामाचे धडे दिले होते. रणजित यांनी जिम्नॅस्टिक्स आणि योगा या खेळांमधील प्रशिक्षकाचा राष्ट्रीय अभ्यासक्रम (एनआयएस) पूर्ण केला. याचप्रमाणे १९७२पर्यंत व्यावसायिक दर्जाचे शरीरसौष्ठव केले. त्यामुळे या खेळांमधील बारकावे त्यांना चांगले ज्ञात होते.

१९ वर्षांची श्रेयशी सध्या शारीरिक शिक्षण शिक्षकाचा अभ्यासक्रम करीत आहे. तंदुरुस्तीचे महत्त्व सर्वाना पटवून देण्याच्या उद्देशानेच करिअरची ही वाट मी निवडली आहे, असे तिने आत्मविश्वासाने सांगितले. तीन वेळा योगा आणि एक वेळ तालबद्ध जिम्नॅस्टिक्समधील राष्ट्रीय विजेतेपद पटकावल्यानंतर वयानुरूप तिने शरीरसौष्ठवाकडे गांभीर्याने लक्ष द्यायला प्रारंभ केला. पाहता पाहता शारीरिक तंदुरुस्तीमध्येसुद्धा श्रेयशी आपला ठसा उमटवायला लागली. २०१३ आणि २०१६मध्ये तिने यात राष्ट्रीय विजेतेपद मिळवण्याची किमया साधली. २०१४मध्ये मुंबईत आणि २०१५मध्ये बँकॉकला झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पध्रेत ती सहभागी झाली, पण अनुभव कमी पडल्याने तिला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. मात्र या वर्षी झालेल्या आशियाई स्पध्रेत रौप्यपदक जिंकून तिने अपेक्षा उंचावल्या आहेत.

जागतिक अजिंक्यपद स्पध्रेतील आव्हान आणि तयारीविषयी श्रेयशी म्हणाली, ‘‘ऑस्ट्रेलियाची ‘मिस ऑलिम्पिया’ ओक्साना ग्रिसिनाचे माझ्या गटात प्रमुख आव्हान अपेक्षित होते. परंतु ती यंदा नसल्याने पदक मिळण्याची आशा बळावली आहे. सकाळी सहा ते मध्यरात्री एक-दीड वाजेपर्यंत मी टप्प्याटप्प्याने दैनंदिन सराव केला आहे. या स्पध्रेत तुमचे सादरीकरण महत्त्वाचे असते. त्यामुळे मी नव्या योजनेसह अवतरत आहे.’’

जगदीश लाडची माघार

भारताचे ८५ ते ९० किलो वजनी गटात प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराष्ट्राच्या जगदीश लाडने गुरुवारी स्पध्रेतून माघार घेतली आहे. प्रकृती बरी नसल्यामुळे तो वजनचाचणीत सहभागी होऊ शकला नाही. त्यामुळे स्वाभाविकपणे तो मुख्य स्पध्रेत खेळू शकणार नसल्याचे भारतीय शरीरसौष्ठव महासंघाकडून सांगण्यात आले.

आज भारताची मदार मणिपूरच्या चारचौघींवर

  • थायलंडमधील दुसऱ्या क्रमांकाचे शहर असे बिरूद मिरवणाऱ्या पट्टाया नगरीत जागतिक शरीरसौष्ठव स्पध्रेत शुक्रवारी पहिल्या दिवशी भारताची प्रमुख मदार असेल ती मणिपूरच्या चारचौघींवर.
  • महिलांच्या ५५ किलोखालील गटात सरिता देवी तर ५५ किलोवरील गटात लीमा चानू, ममोता देवी आणि रबिता देवी उतरणार असून, याव्यतिरिक्त वरिष्ठ, ज्येष्ठ आणि कनिष्ठ हे पुरुषांचे तसेच तंदुरुस्तीशी निगडित विभागात भारताला पदकांची संधी आहे.
  • शरीरसौष्ठव प्रकारातील वरिष्ठ पुरुषांच्या विभागात सर्वासुदी कृष्णा राव, प्रताप कालपुंद्रीकर (दोन्ही ५५ किलो), एस. भास्करन, बलाल खान, एम. राममूर्ती (तिन्ही ६० किलो), अबूबकर, राहुल सिंधा (दोन्ही ६५ किलो) ही मंडळी आपले नशीब अजमावतील.

आज भारताचे आव्हान शरीरसौष्ठव विभाग

  • पुरुष – वरिष्ठ गट- ५५ किलो : सर्वासुदी कृष्णा राव, प्रताप कालपुंद्रीकर; ६० किलो : एस. भास्करन, बलाल खान, एम. राममूर्ती; ६५ किलो : अबूबकर, राहुल सिंधा. ज्येष्ठ गट- ४० ते ४९ वष्रे : सिमाद्री राजेश बाबू, मंदार चवरकर, शशिकुमार नाडर, ईश्वरा गुंडू; ५० ते ५९ वष्रे : जोसेफ पीटीर सुखविंदरसिंह सैनी. कनिष्ठ गट : ७५ किलोखालील : मोहम्मद वश्मीर खान, ७५ किलोवरील : राकेश सिंग.
  • महिला – ५५ किलोखालील : सरिता देवी; ५५ किलोवरील : लीमा चानू, ममोता देवी, रबिता देवी.

तंदुरुस्तीशी निगडित विभाग

  • शारीरिक तंदुरुस्ती महिला – १६० सेमीपर्यंत : सोनिया मित्रा, संजू; १६५ सेमीपर्यंत : श्रेयशी दास चौधरी.
  • क्रीडात्मक शरीरसंपदा पुरुष – १७० सेमीपर्यंत : मनोहर पाटील, सनी रॉय, गौरव अरोरा, मंगेश गावडे.