राष्ट्रकुल स्पर्धेत चौथ्या दिवशीही भारतीय खेळाडूंनी पदकाचा ओघ कायम ठेवला असला तरी एकही सुवर्णपदक कमावता आले नाही.  नेमबाजीत श्रेयसी सिंग हिचे रौप्यपदक रविवारच्या दिवसातील वैशिष्टय़ ठरले. तर भारताने एकूण चार कांस्यपदकांची कमाई केली. नेमबाजीत असाब मोहम्मदने, ज्युदोत राजविंदर कौरने, वेटलिफ्टिंगमध्ये पूनम यादव आणि ओंकार ओतारीने कांस्यपदक मिळवत भारतासाठी रविवारचा दिवस संस्मरणीय ठरवला. बॅडमिंटन आणि टेबल टेनिसमध्ये भारताने उपांत्य फेरी गाठली आहे.
राष्ट्रकुल स्पर्धेच्या चौथ्या दिवशीही भारतीय नेमबाजांची पदकापर्यंतची घोडदौड कायम आहे. श्रेयसी सिंग हिने महिलांच्या दुहेरी ट्रॅप प्रकारात रौप्यपदकाची कमाई केली. त्यामुळे नेमबाजी या प्रकारात भारताची पदकसंख्या आठवर पोहोचली आहे.
२२ वर्षीय श्रेयसीने ९२ गुणांची कमाई करत रौप्यपदकाचा वेध घेतला. इंग्लंडच्या चालरेट केरवूडने ९४ गुणांसह सुवर्णपदक पटकावले. इंग्लंडच्या रचेल पॅरिश हिने ९१ गुणांसह कांस्यपदक मिळवले. पहिल्या फेरीत फक्त २२ गुण मिळवणारी श्रेयसी तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली होती. पण दिल्लीच्या या नेमबाजपटूने अंतिम फेरीत सुरेख कामगिरीचे प्रदर्शन करत रौप्यपदकाला गवसणी घातली. राष्ट्रकुल स्पर्धेत १०६ गुणांचा विक्रम नोंदवणारी केरवूड अंतिम फेरीत वेध घेताना चाचपडत होती. त्यामुळे श्रेयसीला सुवर्णपदक पटकावण्याची संधी चालून आली होती. पण दोन वेळा दुहेरी वेध घेण्यात तिला अपयश आले आणि रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. श्रेयसीने २२, २४, २३, २३ असे गुण मिळवले.
याच गटात भारताच्या वर्षां वर्मन हिला ८८ (२२,१९, २४, २३) गुणांसह पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. नेमबाजीची निवड करून आपण कोणतीही चूक केली नसल्याचे समाधान श्रेयसीच्या चेहऱ्यावर जाणवत होते.“शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी नेमबाजीत पूर्ण वेळ कारकीर्द घडवण्याचा निर्णय घेतला होता. माझ्या कुटुंबीयांकडून त्याला पाठिंबा मिळाला होता. म्हणूनच मी माझे हे रौप्यपदक प्रशिक्षक, सहकारी, मित्र आणि कुटुंबीयांना समर्पित करते. पुढील वेळी सुवर्णपदक पटकावण्याचे माझे ध्येय आहे.”
– श्रेयसी सिंग

नेमबाजी
असाब मोहंमदला कांस्य
भारताच्या असाब मोहम्मद याने नेमबाजीत आणखी एका कांस्यपदकाची भर टाकली. त्याने डबलट्रॅप प्रकारात उत्कंठापूर्ण लढतीनंतर हे पदकजिंकले.
असाब याची अंतिम फेरी थोडक्यात हुकली होती. मात्र कांस्यपदकाच्या लढतीत त्याने शेवटपर्यंत एकाग्रता ठेवीत माल्टा देशाच्या नाथन झुईरेब याच्यावर निसटता विजय मिळविला. २६ वर्षीय असाबने ही लढत २६-२४ अशा फरकाने जिंकली. या स्पर्धेत यंदा पदार्पण करताना त्याने पहिल्याच पदकाची कमाई केली. पदक मिळविल्यानंतर असाब म्हणाला, कांस्यपदकाच्या लढतीच्या वेळी माझ्यावर थोडे दडपण आले होते. मात्र आता पदक मिळविल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे.भारताच्या अंकुर मित्तल याला पाचवे स्थान मिळाले.  इंग्लंडच्या स्टीव्हन स्कॉट याने सुवर्णवेध घेतला तर त्याचा सहकारी मॅथ्यु फ्रेंच याला रौप्यपदक मिळाले.

हॉकी
भारतीय महिला पराभूत
उत्कृष्ट सांघिक व वेगवान खेळाचा प्रत्यय घडवीत न्यूझीलंडने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील महिलांच्या हॉकीत भारताचा ३-० असा सहज पराभव केला व आपली आगेकूच राखली. एकतर्फी झालेल्या या लढतीत न्यूझीलंडने पूर्वार्धात १-० अशी आघाडी घेतली होती. पहिला गोल गिमी फ्लेईनने केला. उत्तरार्धात अ‍ॅनिथा पुंट हिने पेनल्टी कॉर्नरद्वारा एक गोल केला.

वेटलिफ्टिंग
पूनम यादवला कांस्यपदक
पूनम यादव हिने वेटलिफ्टिंगमध्ये भारताला सातवे पदक मिळवून दिले. महिलांच्या ६३ किलो वजनी गटात २०२ किलो वजन उचलत पूनमने कांस्यपदकावर नाव कोरले. या वर्षी आशियाई कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक मिळवणाऱ्या पूनमला ओलायूवातोयिन अडेसानमी आणि ओबिओमा ओकोली या नायजेरियाच्या दोन्ही खेळाडूंच्या खडतर आव्हानाला सामोरे जावे लागले. त्या दोघांनीही पूनमपेक्षा पाच किलो अधिक वजन उचलले. मात्र ओकोली हिचे वजन अडेसानमी हिच्या वजनापेक्षा एका किलोने कमी असल्याने तिला विजयी घोषित करण्यात आले. भारताच्या वंदना गुप्ता हिने १९८ किलो वजन उचलल्यामुळे तिला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
ओमकार ओतारीला कांस्यपदक
ओमकार ओतारीने वेटलिफ्टिंगमध्ये सुरेख कामगिरी करत पुरुषांच्या ६९ किलो वजनी गटात कांस्यपदकाची कमाई केली. २६ वर्षीय ओतारी पहिल्या टप्प्यात आघाडीवर होता. मात्र क्लीन आणि जर्क प्रकारात निराशाजनक कामगिरी केल्यामुळे त्याला कांस्यपदकावरच समाधान मानावे लागले. भारताचे वेटलिफ्टिंगमधील हे सहावे पदक ठरले. मलेशियाच्या मोहम्मद हफिफी मन्सूरने सुवर्ण तर नायजेरियाच्या यिंका अयानुवा याने रौप्यपदक पटकावले. मन्सूरने एकूण ३०५ किलो तर यिंकाने ३०१ किलो वजन उचलले. ओतारीने स्नॅच प्रकारात १३६ तसेच क्लीन आणि जर्क प्रकारात १६० असे एकूण २९६ किलो वजन उचलत तिसरा क्रमांक मिळवला. ओतारी आणि मन्सूर यांच्यातच सुवर्णपदकासाठी लढत रंगली होती. क्लीन आणि जर्क प्रकारात ओतारीने १६० किलो वजन उचलले. पण १६२ किलो वजन उचलण्याचा त्याचा प्रयत्न फसला. मात्र मन्सूर आणि यिंकाने १६६ किलो वजन उचलत ओतारीला मागे टाकले.

ज्युदो
राजविंदर कौरला कांस्यपदक
भारताच्या राजविंदर कौरने महिलांच्या ७८ किलोपेक्षा अधिक वजनी गटातील ज्युदो स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली. कांस्यपदकासाठी झालेल्या सामन्यामध्ये राजविंदरने केनियाच्या इस्थर अकिनयी राटुगीचा पेनल्टी गुणांच्या जोरावर पराभव केला. चार मिनिटांच्या सामन्यामध्ये राटुगीकडून तीनदा चुका झाल्या, तर राजविंदरकडून एकही चूक झाली नाही. उपान्त्यपूर्व लढतीमध्ये राजविंदरला इंग्लंडच्या जे मयेर्सकडून पराभव स्वीकारावा लागला होता. पण त्यानंतर कॅनडाच्या सोफि व्हॅइलानकोर्टला पराभूत केल्यामुळे राजविंदरला कांस्यपदक कमावण्याची संधी मिळाली. भारताला ज्युदोमधून मिळालेले हे चौथे पदक आहे.
अन्य लढतींमध्ये पुरुष गटामध्ये भारताच्या साहिल पठानिया (१००पेक्षा अधिक वजनी गट) आणि महिलांमध्ये जिना देवी चाँगथम (७८ किलो वजनी गट) यांना पराभवाचा सामना करावा लागला.

स्क्वॉश
सौरवची आगेकूच; दीपिकाचे आव्हान संपुष्टात
पदकांची मोठी अपेक्षा बाळगणाऱ्या भारताला स्क्वॉशमध्ये संमिश्र यशाला सामोरे जावे लागले. सौरव घोशालने एकेरीची उपान्त्य फेरी गाठली. मात्र अव्वल कामगिरीची अपेक्षा असलेल्या दीपिका पल्लिकलचे एकेरीतील आव्हान संपुष्टात आले.
घोशालने न्यूझीलंडच्या कॅम्पबेल ग्रेसॉनचा ८-११, ७-११, ११-६, ११-८, ११-८ असा पराभव केला. पहिले दोन गेम्स गमावल्यानंतर सौरवने परतीच्या फटक्यांवर नियंत्रण राखले व उर्वरित तीनही गेम्स घेत विजयश्री खेचून आणली. सौरवने त्याआधी ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्हन फिनित्सिस याच्यावर निसटता विजय मिळविला होता. १९९८ नंतर प्रथमच भारतीय खेळाडूने या खेळात उपान्त्य फेरी गाठली आहे.
दीपिकाला महिलांच्या एकेरीत इंग्लंडच्या अ‍ॅलिसन वॉटर्सने पराभवाचा धक्का दिला. तिने हा सामना ८-११, ११-२, ११-९, ११-९ असा जिंकला. पहिली गेम जिंकूनही दीपिकाला त्याचा फायदा घेता आला नाही. त्याआधी दीपिका हिने मलेशियाच्या डेलिया अर्नॉल्डला पराभूत केले होते.

बॅडमिंटन
भारतीय संघ उपांत्य फेरीत
ग्लासगो : भारताची युवा लक्षवेधी बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूला पराभवाचा धक्का बसूनही भारताने उपान्त्य फेरीत मजल मारली आहे. सांघिक कामगिरीच्या जोरावर भारताने कॅनडावर ३-१ अशा फरकाने मात केली.
पहिल्या सामन्यात मिश्र दुहेरीमध्ये के. श्रीकांत आणि ज्वाला गट्टा यांनी कॅनडाच्या टॉबी एनजी आणि अ‍ॅलेक्स यांच्यावर २१-१९, १७-२१ आणि २१-१८ असा अटीतटीच्या लढतीत विजय मिळवत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दुसऱ्या पुरुष एकेरीतील सामन्यात पारुपल्ली कश्यपने अ‍ॅड्रय़ू डिसूझाचा २१-११, २१-९ असा फडशा पाडत भारताला २-० अशी आघाडी मिळवून दिली. तिसऱ्या महिला एकेरीच्या लढतीत सिंधूला मिचेलने १५-२१, २२-२०, २१-१७ असा पराभवाचा धक्का दिला. पण चौथ्या पुरुष दुहेरीच्या लढतीमध्ये प्रणव चोप्रा आणि अक्षय देवलकर यांनी अ‍ॅड्रियन लिऊ आणि डेरिक एनजी यांच्यावर ४९ मिनिटांमध्ये २१-१५, १९-२१ आणि २१-१३ असा विजय मिळवत भारताला ३-१ अशी आघाडी मिळवून दिली व भारतीय संघ उपान्त्य फेरीत दाखल झाला.

टेबल टेनिस
पुरुष उपांत्य फेरीत
भारताच्या महिलांना पराभव स्वीकारावा लागला असला तरी  पुरुषांनी मात्र उपांत्य फेरीत स्थान पटकावले आहे. पुरुषांनी स्कॉटलंडवर ३-० असा निर्विवाद विजय मिळवला, तर महिलांना सिंगापूरकडून १-३ असे पराभूत व्हावे लागले.
पुरुषांमध्ये पहिल्या सामन्यात सौम्यजित घोषने स्कॉटलंडच्या गेव्हिन रूमगेला ११-६, ११-५ आणि ११-६ असे सहजपणे पराभूत करत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सामन्यात अनुभवी अचांता शरथ कमलने क्रेग हाऊइसनवर ११-७, ११-७, ११-८ असा विजय मिळवला. तिसऱ्या पुरुष दुहेरीच्या सामन्यामध्ये सौम्यजित घोष आणि हरमीत सिंग यांनी सीन डोहर्टी आणि क्रेग हाऊइसन या जोडीवर ११-७, ११-८, ११-६ असा विजय मिळवला आणि भारताने ३-० अशा निर्विवाद आघाडीसह उपांत्य फेरीत प्रवेश केला.
महिलांचे कांस्यपदक हुकले
नवी दिल्लीतील राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक पटकावणाऱ्या भारतीय महिला टेबल टेनिस संघाला रविवारी ग्लासगो येथील राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्यपदकाने हुलकावणी दिली. कांस्यपदकासाठीच्या सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून ३-१ असे पराभूत व्हावे लागले. झियू झँग हिने शामिनी कुमारसेन आणि मधुरिका पाटकरविरुद्धच्या एकेरीच्या दोन लढती जिंकत ऑस्ट्रेलियाच्या विजयात मोलाचा हातभार लावला. झँगने शामिनीला ११-५, २-११, ११-६, ११-९ असे हरवले. त्यानंतर मानिका बात्राने फँग ले हिला ११-५, ८-११, ११-८, ११-७ असे पराभूत करत भारताला बरोबरी साधून दिली. मात्र त्यानंतर शामिनी-मधुरिका जोडीला दुहेरीत आणि त्यानंतर मधुरिकाला एकेरीत पराभूत व्हावे लागले.

जिम्नॅस्टिक
आशीषकुमारवर पदकाच्या आशा
नवी दिल्लीतील स्पर्धेत रौप्यपदक मिळविणाऱ्या आशीषकुमार याच्याकडून भारताला येथील जिम्नॅस्टिक्समध्ये पदकाच्या आशा आहेत. गतवेळी त्याने ‘फ्लोअर एक्झरसाईज’मध्ये रौप्य व ‘व्हॉल्ट’ प्रकारामध्ये कांस्यपदक मिळविले होते.
आशीष म्हणाला, या स्पर्धेत आम्हाला किमान तीन पदकांची कमाई करता येईल. महिलांमध्ये दीपा कर्माकरकडून पदकाच्या आशा आहेत. तिने राष्ट्रीय स्पर्धेत अतिशय प्रभावी कामगिरी केली होती. येथील स्पर्धेसाठी तिने कसून सराव केला आहे. दीपाने २०१०च्या राष्ट्रकुल स्पर्धेत अंतिम फेरी गाठली होती. मात्र त्या वेळी तिला पदकाने हुलकावणी दिली होती.
 कलात्मक जिम्नॅस्टिक्सकरिता भारतीय संघ
पुरुष: आशीषकुमार, राकेश पात्रा.
महिला: दीपा कर्माकर, प्रणती दास, प्रणाती नायक, अरुणा रेड्डी, ऋचा दिवेकर.

‘लोकसत्ता’च्या २५ जुलैच्या अंकातील ‘सुवर्णलिफ्टिंग’ या बातमीत अनवधानाने वेटलिफ्टिंग
ऐवजी पॉवरलिफ्टिंग असे प्रसिद्ध झाले होते.