मोहिंदर अमरनाथ यांचा गौप्यस्फोट
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियातील दारुण पराभवानंतर भारताचा संघनायक महेंद्रसिंग धोनी याला कर्णधारपदावरून काढून टाकावे, अशी शिफारस या वर्षीच्या जानेवारी महिन्यात निवड समितीने केली होती. पण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी निवड समितीने एकमताने केलेली शिफारस फेटाळून लावल्याचा गौप्यस्फोट भारताचे माजी कर्णधार आणि निवड समितीचे तत्कालीन सदस्य मोहिंदर अमरनाथ यांनी केल्यामुळे धोनी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
‘‘निवड समितीतील पाचही सदस्यांनी धोनीची कर्णधारपदावरून हकालपट्टी करण्याचे ठरवले होते. पण श्रीनिवासन यांनी याप्रकरणी मध्यस्थी करून हा निर्णय रद्दबातल ठरवला. एखादी व्यक्ती सर्व गोष्टीत ढवळाढवळ करणार असेल तर निवड समितीची गरजच काय? बीसीसीआयची आचारसंहिता कुणाला माहीत आहे? विद्यमान निवड समितीला आचारसंहितेची कल्पना आहे का? आम्ही विश्वासाने आणि प्रामाणिकपणे काम करत असतो. ऑस्ट्रेलियातील सीबी मालिकेसाठी आम्ही १७ खेळाडूंची निवड केली, पण कर्णधाराचे नाव ठरवले नाही. तिरंगी मालिकेसाठी आम्ही कर्णधाराशिवाय संघ निवड केली. पण कर्णधाराची निवड दुसरीच व्यक्ती करते,’’ असेही अमरनाथ यांनी सांगितले.
म्अमरनाथ यांच्या टीकेची मात्र धोनीला पर्वा नाही. तो म्हणतो, ‘‘जेव्हा आम्ही चांगली कामगिरी करतो, तेव्हा आमच्यावर अभिनंदनाचा वर्षांव होत असतो. पण आम्ही त्याने हुरळून जात नाही. मात्र आमच्याकडून खराब कामगिरी होते, तेव्हा हीच माणसे आमच्यावर कडाडून टीका करतात. म्हणूनच खेळाची मजा लुटायची असेल तर या मधला मार्ग शोधायला हवा,’’ असे धोनीने सांगितले.