हातात कधीही झाडू न घेणाऱ्या शुभश्री राजेंद्र हिने आशियाई क्रीडा स्पर्धेत अश्वारोहणात पदक मिळविण्याच्या हेतूने अफाट कष्ट घेतले आहेत. प्रशिक्षकाकडून एका सत्राचे प्रशिक्षण मोफत मिळावे, या हेतूने तिने तबेला साफ करण्यापासून सर्व कामे केली. या अफाट कष्टाचे चीज आशियाई पदकामध्ये होईल अशी तिला खात्री आहे.
शुभश्री ही माजी राष्ट्रीय धावपटू राजेंद्र शर्मा यांची मुलगी. लहानपणी ती खूप आळशी होती. सकाळी ११ वाजेपर्यंत ती अंथरुणातून बाहेर येत नसे. तिचा आळस घालवण्यासाठी तिला जलतरणाच्या शिबिराला पाठविण्यात आले. मात्र तेथे तिला फारशी रुची वाटली नाही. टीव्हीवर घोडय़ांच्या शर्यती पाहून आपणही या खेळात भाग घेतला पाहिजे असे तिला वाटू लागले. मध्यमवर्गीय कुटुंबात राहणाऱ्या राजेंद्र यांनी शुभश्री हिला अश्वारोहणात करिअर करण्यासाठी प्रोत्साहन दिले. तिची बहीण वैद्यकीय शाखेत शिकत असल्यामुळे तिच्याकरिताही राजेंद्र यांची खूप आर्थिक ओढाताण होत होती, परंतु तरीही त्यांनी शुभश्रीच्या छंदाला प्रोत्साहन दिले. जयपूर येथे अश्वजंपिंगचे वर्ग घेतले जातात. या शिबिरात भाग घेण्यासाठी तिला पहाटे साडेपाचला जावे लागत असे. राजेंद्र यांना ही वेळेवर कशी जाणार असा प्रश्न होता, मात्र तिने कधीही कुरकुर न करता या वर्गात प्रशिक्षण घेतले.
विकी थॉम्पसन हे इंग्लंडमध्ये या खेळाचे प्रशिक्षण देतात. विशेषत: ड्रेसेज या क्रीडाप्रकारात ते अव्वल दर्जाचे प्रशिक्षक मानले जातात आणि शुभश्री हिला या प्रकारातच खरी रुची आहे. तीन महिन्यांच्या प्रशिक्षण शिबिरासाठी साधारणपणे एक कोटी खर्च येतो. राजेंद्र यांनी बँकेकडून मदत घेत शुभश्रीला तिथे प्रवेश दिला. दररोज तीन सत्रांत हे प्रशिक्षण दिले जाते. शुभश्री हिने तबेला साफ करण्यासाठी व घोडय़ांना स्वच्छ धुण्यासाठी मदत केली तर आठवडय़ातून एक सत्र तिला मोफत शिकवले जाईल, असे थॉम्पसन यांनी तिला सांगितले. शुभश्री हिने ही अट मान्य केली आणि त्याची अंमलबजावणीही केली.
शुभश्री ही दररोज दहा ते बारा तास या खेळासाठी देत आहे. आशियाई स्पर्धेत पदक मिळविणे हे आव्हान असले, तरी या खेळासाठी आपण केलेल्या अफाट कष्टांमुळे पदकाचे स्वप्न साकार होईल, असा आत्मविश्वास तिला वाटत आहे.