मुंबईचा गुणवान युवा फलंदाज सिद्धेश लाड याचे नाव वानखेडे स्टेडियमवर सुरू झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या प्रारंभी प्रसारमाध्यमांना देण्यात आलेल्या भारतीय संघाच्या यादीत पाहिल्यावर साऱ्यांनाच आश्चर्य वाटले. पण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) कोणतेही अधिकृत पत्रक किंवा माहिती देण्यात आलेली नसल्यामुळे याबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
संभाव्य संघातील, पण अंतिम ११ खेळाडूंमध्ये नसलेल्या खेळाडूला स्थानिक सामने खेळायचे असतील किंवा संघातील दुखापतग्रस्त खेळाडूंची संख्या वाढल्यास यजमान संघ स्थानिक खेळाडूंना संघात ‘राखीव’ म्हणून सहभागी करतात. पण सावधगिरीची उपाययोजना म्हणून शेवटच्या क्षणी भारतीय संघाने एकंदर १५ खेळाडूंच्या यादीत सिद्धेश लाडला स्थान दिले आहे. याचप्रमाणे मुंबईच्या गौरव जठारलाही संघासोबत ठेवण्यात आले आहे. यापूर्वीही काही वेळा स्थानिक खेळाडूंना ‘राखीव’ म्हणून संघात सहभागी करण्यात आलेले आहे. त्यामुळे याबद्दल आश्चर्य वाटण्याचे कारण नाही, अशी माहिती बीसीसीआयच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली.
स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केल्यामुळे या दोघांना संघात ‘राखीव खेळाडू’ म्हणून स्थान देण्यात आले आहे. या गोष्टीचा या दोन्ही युवा खेळाडूंना चांगलाच फायदा होईल. भारतीय खेळाडूंबरोबर ‘ड्रेसिंग रूम’मधील आणि मदानावरील अनुभवांचा या दोन्ही युवा खेळाडूंना भविष्याच्या दृष्टीने चांगलाच फायदा होईल, असे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले.
वेगवान गोलंदाज उमेश यादव दुखापतग्रस्त असल्याने त्याच्या जागी भारतीय संघाच्या यादीत सिद्धेशचे नाव ठेवण्यात आले आहे. भारतीय संघ व्यवस्थापनाने बीसीसीआयची यासाठी रीतसर परवानगी घेतली असून त्यानंतरच संघाची यादी बनवण्यात आली आहे. संघाला कदाचित राखीव खेळाडूंची गरज भासू शकते, हा विचार करूनच मंडळाने ही विनंती मान्य केली आहे, असे सूत्रांनी सांगितले.
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पूर्वी इशांत शर्मा दुखापतग्रस्त असल्याने बंगालचा वेगवान गोलंदाज अशोक दिंडाला अहमदाबादला बोलावण्यात आले होते. पण त्याचा समावेश संघाच्या १५ खेळाडूंच्या यादीत नव्हता. फक्त सावधगिरी म्हणून त्याला बोलावले होते. बीसीसीआय संघाची घोषणा करताना किंवा दुखापतग्रस्त खेळाडूच्या जागी अन्य खेळाडूला स्थान देताना पत्रक काढते. दुसऱ्या कसोटी सामन्याच्या वेळी राखीव खेळाडू म्हणून सिद्धेशला संघात घेताना मात्र बीसीसीआयने याविषयी अधिकृत घोषणा का केली नाही, हा प्रश्न मात्र सर्वानाच भेडसावतो आहे.