‘प्रोडय़ुनोव्हा’हा जिम्नॅस्टिक्समधील अतिशय धोकादायक प्रकार आहे. दीपा कर्माकर ही भारतीय खेळाडू तो अवघड प्रकार करीत असते. अन्य क्रीडा प्रकारांमध्ये मला चांगले यश मिळत असल्यामुळे मी हेतूपूर्वक तो धोका पत्करत नाही, असे अमेरिकन जिम्नॅस्टिकपटू सिमोनी बिल्सने सांगितले. सिमोनीने रिओ येथे नुकत्याच झालेल्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत चार सुवर्णपदकांची कमाई केली होती.

दीपाला रिओ येथील ऑलिम्पिकमध्ये चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. सिमोनीने या स्पर्धेतील व्हॉल्ट, फ्लोअर एक्झरसाइज, सर्वसाधारण व सांघिक अशा चार प्रकारांमध्ये सोनेरी कामगिरी केली होती.

सिमोनीने दीपाच्या कौशल्याविषयी म्हटले की, ‘‘दीपाशी मला तेथे फारसे बोलता आले नाही. मात्र तिच्या शैलीविषयी मला खूप आदर वाटतो. तिने अत्यंत दुर्मीळ प्रकार करून दाखवला. तिच्या या प्रकाराविषयी मायदेशात खूप उत्कंठा निर्माण झाली होती. तिला जरी कांस्यपदक मिळवता आले नाही तरीही तिच्या कामगिरीची प्रेरणा घेत भारतात अनेक लहान मुली या खेळाकडे वळतील, अशी माझी खात्री आहे.’’

‘‘रिओ येथील ऑलिम्पिक सुवर्णपदकांनंतर माझे जीवन खूप बदलले आहे. व्हाइट हाऊसला भेट देण्याची माझी इच्छा होती. हे स्वप्न सुवर्णपदकांनंतर साकार झाले. एवढेच नव्हे, तर तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची तेथे भेट झाल्यामुळे मला खूपच आनंद झाला,’’ असेही सिमोनीने सांगितले.