भारताचे आशास्थान असलेल्या सायना नेहवाल हिला जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीतच अग्रमानांकित ली झुरेई हिच्याकडून पराभवास सामोरे जावे लागले मात्र तिची वारसदार असलेल्या पी.व्ही.सिंधू हिने द्वितीय मानांकित वाँग शिक्सियन हिच्यावर सनसनाटी विजय मिळवीत उपांत्य फेरी गाठली. या विजयासह सिंधूचे  या स्पर्धेतील पदक निश्चित झाले आहे.
चीनच्या झुरेई हिने सायनाची घोडदौड २१-१५, २१-१५ अशी सरळ दोन गेम्समध्ये संपुष्टात आणली. या स्पर्धेतील पदकाच्या आशा कायम ठेवताना सिंधूने वाँग हिला १९-२१, २१-१९, २१-१५ असे रोमहर्षक लढतीत पराभूत केले.
ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सायना हिला झुरेईविरुद्ध अपेक्षेइतका प्रभावी खेळ करता आला नाही. पहिल्या गेममध्ये झुरेई हिने ९-४ अशी आघाडी घेतली. त्यानंतर सायना हिने स्मॅशिंगचा कल्पकतेने उपयोग करीत ही आघाडी १०-८ अशी कमी केली. मात्र त्यानंतर झुरेई हिने सायनाच्या चुकांचा पुरेपूर फायदा घेत १८-११ अशी आघाडी मिळविली. सायना हिने ही आघाडी कमी करण्याचा प्रयत्न केला मात्र झुरेईने खेळातील सातत्य टिकवीत ही गेम २१-१५ अशी घेतली.
दुसऱ्या गेममध्ये ५-५ अशा बरोबरीनंतर सायनाने ९-५ अशी आघाडी घेतली. तिने १२-८ अशी आघाडी वाढविली. मात्र पुन्हा सायना हिला स्वत:च्या खेळावर नियंत्रण ठेवता आले नाही. १२-१२ अशा बरोबरीमुळे सायनाच्या खेळातील चुका वाढतच गेल्या. १३-१३ अशा बरोबरीनंतर झुरेई हिने सलग चार गुण घेत सामन्याचे पारडे पुन्हा आपल्या बाजूने झुकविले. ही गेम २१-१५ अशी घेत तिने सामनाही जिंकला. सायनाचा झुरेईविरुद्ध हा आठवा पराभव आहे.
सामना संपल्यानंतर सायना म्हणाली, माझा खेळ खूपच खराब झाला. दोन्ही गेम्समध्ये मी परतीच्या फटक्यांवर नियंत्रण ठेवू शकले नाही. दुसऱ्या गेममध्ये मोठी आघाडी मिळूनही मला त्याचा फायदा घेता आला नाही. अर्थात झुरेई हिने सुरेख खेळ केला.
झुरेई हिला उपांत्य फेरीत जपानच्या मिनात्सु मितानी हिच्याशी खेळावे लागणार आहे. मिनात्सु हिने पाचव्या मानांकित जेई हुआन सुआंग हिच्यावर ९-२१, २१-१८, २२-२० असा रोमहर्षक विजय मिळविला.
सिंधू व वाँग यांच्यातील सामना शेवटपर्यंत रंगतदार झाला. दोन्ही खेळाडूंनी कॉर्नरजवळील प्लेसिंग, स्मॅशिंगचे सुरेख फटके, अचूक सव्‍‌र्हिस असा चतुरस्र खेळ केला. वाँग हिने पहिली गेम घेतली मात्र दुसऱ्या गेममध्ये सिंधूने सुरुवातीपासूनच खेळावर नियंत्रण घेतले. १६-१९ अशा पिछाडीवरून वाँगने १९-२० अशी चुरस निर्माण केली. मात्र त्यानंतर सलग दोन गुण घेत सिंधूने ही गेम घेतली. १-१ अशा बरोबरीनंतर तिसऱ्या गेमबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली. दोन्ही खेळाडूंमध्ये प्रत्येक गुणासाठी चिवट झुंज दिसून आली. ८-८ अशा बरोबरीनंतर १५-१५ गुणांपर्यंत बरोबरी कायम होती. त्यानंतर सिंधूने ड्रॉपशॉट्स व स्मॅशिंग असा सुरेख खेळ करीत सलग सहा गुण घेत विजयावर मोहोर नोंदविली. तिने केलेल्या चतुरस्र खेळापुढे वाँगला पुन्हा संधीच मिळाली नाही. हा सामना ८५ मिनिटे चालला होता.
सामना संपल्यानंतर सिंधू म्हणाली, वाँगविरुद्ध मी यापूर्वी विजय मिळविला असल्यामुळे मला विजयाची खात्री होती. पहिली गेम केवळ दोन गुणांच्या फरकाने गमावली होती. त्यामुळे मी धीर सोडला नाही. दुसऱ्या गेमपासून खेळावर नियंत्रण राखण्याचा माझा प्रयत्न होता व त्यामध्ये मी यशस्वी झाले. या सामन्यातील खेळाबाबत मी समाधानी आहे. आता उपांत्य फेरीत विजय मिळविण्याचेच माझे ध्येय आहे.