जवळजवळ तीन दशकांपूर्वी आपल्या आक्रमक शैलीने फलंदाजीला एक नवी परिभाषा देणारे महान क्रिकेटपटू सर विवियन रिचर्ड्स सचिन तेंडूलकरचे चाहाते आहेत. आईसीसीसाठी लिहिलेल्या एका लेखात रिचर्ड्स यांनी त्यांच्या आवडीच्या काही एकदिवसीय फलंदाजांची नावे नमुद केली आहेत, ज्यात सचिन तेंडुलकर आणि भारताचा सध्याचा नंबर एकचा फलंदाज विराट कोहलीच्या नावाचा समावेश आहे. या लेखात रिचर्ड म्हणतात, पहिल्यांदा जे नाव डोक्यात येते, तो आहे सचिन तेंडूलकर. माझ्या मते तो अद्वितीय आहे. तो असा एक खेळाडू आहे की ज्याच्याशिवाय एखाद्या संघाची निवड झाली, तर ती एक शरमेची बाब ठरेल. तेंडुलकर नेहमीच माझ्या आवडत्या फलंदाजांपैकी एक राहिला आहे. जगातील अन्य क्रिकेटपटुंपेक्षा त्याचा बांधा छोटा होता, परंतु चांगल्या गोष्टी छोट्या स्वरुपातच येतात. तो एक महान फलंदाज असल्याचे सांगत या लेखात रिचर्ड यांनी सचिनबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. विराट कोहली विषयी ते लिहितात, एवढ्या कमी वयात त्याने क्रिकेटमध्ये इतकी शतक जमा केली आहेत. एकदिवसीय क्रिकेटमधील त्याचा आत्मविश्वास कमालीचा आहे. याचा अर्थ अस नव्हे की, टेस्ट क्रिकेटमध्ये त्याचा आत्मविश्वास कमी असतो, परंतु मला त्याची एकदिवसीय क्रिकेटमधली आक्रमक शैली पसंत आहे.