*  अतिसंथ खेळाने पहिला दिवस कंटाळवाणा
*  प्रांरभी मिळविलेले नियंत्रण नंतर भारताने गमावले
*  केव्हिन पीटरसनचे दमदार अर्धशतक
*  इंग्लंडची पहिल्या दिवशी ५ बाद १९९ अशी मजल
*  जो रुट, जडेजाचे लक्षवेधी पदार्पण
भारतीय गोलंदाजांनी इंग्लिश फलंदाजांवर प्रारंभी मिळविलेले नियंत्रण नंतर त्यांना राखता आले नाही. त्यामुळे ५ बाद १३९ अशा वाईट अवस्थेनंतर इंग्लिश संघाने चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर ५ बाद १९९ अशी मजल मारली. कप्तान अ‍ॅलिस्टर कुक मोठी खेळी उभारण्यात पहिल्या डावात अपयशी ठरला. परंतु अनुभवी केव्हिन पीटरसन याने ७३ धावांची दमदार खेळी साकारली. खेळ थांबला तेव्हा रूट आणि प्रॉयर अनुक्रमे ३१ आणि ३४ धावांवर खेळत होते. जलदगती आणि फिरकी गोलंदाजीला फारशी साथ न देणाऱ्या जामठाच्या खेळपट्टीवर दुपारनंतर झालेल्या अतिसंथ खेळाने भारत-इंग्लंड यांच्यातील चौथ्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी प्रेक्षक अक्षरश: कंटाळले. इंग्लंडकडून कसोटी पदार्पण करणाऱ्या जो रूटने ४४ धावा काढून, तर भारताच्या रवींद्र जडेजाने २ बळी घेऊन क्रिकेटरसिकांचे लक्ष वेधून घेतले.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या इंग्लंड संघाच्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली. मोठी धावसंख्या उभारण्याच्या इराद्याने मैदानात उतरलेल्या अ‍ॅलिस्टर कुक व निक कॉम्प्टन या सलामीच्या जोडीला पाचव्या षटकातच धक्का बसला. कॉम्प्टनच्या ३ धावा झाल्या असताना इशांत शर्माच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीने त्याचा झेल टिपला. एका बाजूने खंबीरपणे किल्ला लढवणाऱ्या कर्णधार अ‍ॅलिस्टर कुकचा बेत उधळून लावत इशांत शर्माने त्याला अवघ्या एक धावसंख्येवर पायचीत केले. उपाहारापर्यंत इंग्लंड संघाने २ बाद ६१ धावा केल्या होत्या.
यानंतर जोनाथन ट्रॉट व केव्हिन पीटरसन या जोडीने इंग्लंडचा डाव सावरण्याच्या प्रयत्नात तिसऱ्या विकेटसाठी ८६ धावांची भागीदारी करत संघाला शतकी धावसंख्या ओलांडून दिली. इशांतच्या गोलंदाजीवर ट्रॉटविरुद्ध करण्यात आलेले पायचीतचे जोरदार अपील पंच कुमार धर्मसेना यांनी फेटाळून लावले. परंतु धावफलक १०२वर असताना जडेजाच्या एका उसळत्या चेंडूने ट्रॉटचा ऑफ स्टंप उडवला. ट्रॉटने ७ चौकारांच्या सहाय्याने ४४ धावा काढल्या. त्यानंतर खेळण्यास आलेल्या इयान बेलला सूर गवसला नाही. २८ चेंडूंमध्ये केवळ एक धाव काढली असताना लेग-स्पिनर पीयूष चावलाच्या चेंडूवर विराट कोहलीने शॉर्ट कव्हरवर त्याचा सहजपणे झेल घेतला.
तिसऱ्या सत्राची सुरुवात झाली तेव्हा वातावरणात जरा रंगत आली. केव्हिन पीटरसन आज सुदैवी ठरला. इशांतच्या गोलंदाजीवर पीटरसनचा एक अवघड झेल मिडविकेटवर टिपण्यात पुजारा अयशस्वी ठरला. पीटरसनच्या ७ चौकारांसह ७३ धावा झाल्या असताना जडेजाने त्याला मिडविकेटवर उभ्या असलेल्या प्रग्यान ओझाच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. यानंतर जो रूट आणि मॅट प्रॉयर या जोडीने वेळकाढूपणाचे धोरण अवलंबले. त्यांनी सहाव्या विकेटसाठी आतापर्यंत ९० धावांची भागीदारी केली आहे.
कोलकाता सामन्यात खेळलेल्या संघात इंग्लंडने दोन बदल केले. दुखापत झालेल्या स्टीव्हन फिनच्या जागी टिम ब्रेस्ननला, तर समित पटेलच्या जागी जो रूटला संधी देण्यात आली. भारतातर्फे रवींद्र जडेजाने या सामन्यानिमित्त कसोटीत पदार्पण केले, तर पीयूष चावला याला चार वर्षांच्या कालावधीनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमनाची संधी मिळाली.    

क्षणचित्रे
*   सुमारे पाच हजार प्रेक्षकांनी कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी जामठा स्टेडियमवर हजेरी लावली.
*   प्रथमच कसोटी सामना खेळणाऱ्या रवींद्र जडेजाला सचिन तेंडुलकरने, तर जो रूटला पॉल कॉलिंगवूडने ‘टेस्ट कॅप’ प्रदान केली.
*   ‘बार्मी आर्मी’ने जामठावरही इंग्लंड संघाला जोशात प्रोत्साहन दिले
*   सामना पाहण्यासाठी इंग्लंडहून आलेला जॉन ऱ्होड्स याची उपस्थिती लक्षणीय ठरली होती. पन्नाशी उलटलेल्या ऱ्होड्सला गुणलेखनचा छंद आहे. गुणलेखनाचे साहित्य सोबत ठेवून तो सामन्याचा आनंद घेत होता.
*   विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्यावतीने शाळकरी मुलांना क्रिकेट सामना पाहण्यासाठी नि:शुल्क प्रवेश देण्यात येतो. त्यानुसार सेंटर पॉइंट व सोमलवार शाळेच्या मुलांनी सामन्याचा आनंद लुटला.

आजवरची सर्वात संथ खेळपट्टी -पीटरसन
आतापर्यंतच्या माझ्या कसोटी कारकीर्दीत मी पाहिलेली ही सर्वात संथ खेळपट्टी असल्यामुळे इंग्लंड संघाच्या धावसंख्येबाबत आताच भाकीत करता येणार नाही, असे इंग्लंडचा अनुभवी फलंदाज केव्हिन पीटरसन याने सांगितले. जामठय़ाची खेळपट्टी ही अतिशय कठीण खेळपट्टी असल्याचे मत गुरुवारी अर्धशतक झळकावणाऱ्या पीटरसनने व्यक्त केले. इशांत शर्माची गोलंदाजी खेळणे कठीण जात होते. परंतु स्वत:च्या कामगिरीबद्दल मी समाधानी आहे, असे त्याने सांगितले. पीयूष चावला आणि रवींद्र जडेजा हे चांगले खेळाडू असल्याचे मतही त्याने व्यक्त केले. आमच्या संघाची स्थिती ठीक आहे, तथापि किती धावसंख्या गाठली जाईल, याबाबत आताच सांगता येणार नाही. आम्ही प्रत्येक सत्राप्रमाणे फलंदाजी करू, असे तो म्हणाला.    

कसोटी खेळण्याचे स्वप्न पूर्ण झाले -जडेजा
देशासाठी कसोटी सामना खेळणे, हे माझे स्वप्न होते आणि पहिल्याच सामन्यात बळी मिळाल्याचा आनंद होणे स्वाभाविक आहे, असे मनोगत कसोटीत पदार्पण करणारा भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याने व्यक्त केले.
जामठाची पाटा खेळपट्टी आज वेगवान आणि फिरकी दोन्ही गोलंदाजांनाही अनुकूल नव्हती. या संथ खेळपट्टीवर चेंडू जास्त वळत नसल्याने फिरकी गोलंदाजांना गोलंदाजी करणे आव्हानात्मक ठरत होते. यामुळेच यष्टीवर चेंडू फेकून इंग्लिश फलंदाजांना चेंडू सीमापार न मारू देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आम्ही त्यांना जितक्या कमी धावा देऊ तितके चांगले आहे. कारण दुसऱ्या-तिसऱ्या दिवसापासून चेंडू वळू लागल्यानंतर आम्हा फिरकी गोलंदाजांना त्याचा फायदा होईल. प्रतिस्पर्धी संघाला ३००-३५०पेक्षा अधिक मजल न मारू देण्याचे आम्ही ठरवले आहे असे जडेजा म्हणाला.
रणजी आणि कसोटी सामन्यात खूप फरक आहे, हे मला मैदानावर उतरताच जाणवत होते. पहिलाच कसोटी सामना खेळताना सुरुवातीला दडपण होते. मात्र ट्रॉटच्या रूपात पहिली विकेट मिळाल्यावर आनंद झाला, असेही जडेजाने बोलून दाखवले.    

धावफलक
इंग्लंड (पहिला डाव) : अ‍ॅलिस्टर कुक पायचित इशांत शर्मा १, निक कॉम्प्टन झे. धोनी गो. इशांत शर्मा ३, जोनाथन ट्रॉट त्रिफळा जडेजा ४४, इयान बेल झे. कोहली गो. चावला १, केव्हिन पीटरसन झे. ओझा गो. जडेजा ७३, रूट खेळत आहे ३१, प्रॉयर खेळत आहे ३४, अवांतर १२ (५ बाइज, ७ लेगबाईज), एकूण ९७ षटकांत ५ बाद १९९ धावा.
बाद क्रम : १-३, २-१६, ३-१०२, ४-११९, ५- १३९.
गोलंदाजी : इशांत शर्मा १९-७-३२-२, प्रग्यान ओझा २७-९-५०-०, रवींद्र जडेजा २५-१३-३४-२, पीयूष चावला १३-१-३९-१, आर. अश्विन १३-२-३२-०.