नाताळच्या दिवसांत मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामन्याचा आस्वाद घेण्यासाठी मोठय़ा संख्येने आलेल्या उत्साही क्रिकेटरसिकांचा ‘स्मिथ’ नामाचा जयघोष अविरत चालू होता. एका क्रिकेटचाहत्याच्या हाती ‘रन-स्मिथ’ हा फलकसुद्धा होता. या जल्लोषाचे कारणही तसेच होते. संघनायक स्टीव्ह स्मिथच्या दिमाखदार १९२ धावांच्या खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ५३० धावांचा डोंगर उभारला. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटचाहत्यांच्या चेहऱ्यांवर ‘स्मित’ दिसत होते. k06

ऑस्ट्रेलियाने ५ बाद २५९ धावसंख्येवरून आपला डाव पुढे सुरू केला आणि स्मिथने तळाच्या फलंदाजांना सोबतीला घेत वेगाने धावा काढल्या. त्याने ब्रॅड हॅडिन (५५) सोबत सहाव्या विकेटसाठी ११० धावांची भागीदारी रचली. ब्रिस्बेन कसोटीप्रमाणेच ऑस्ट्रेलियाच्या तळाच्या फलंदाजांनी धावसंख्येत मोलाची भर घालत भारतीय गोलंदाजीच्या माऱ्याच्या मर्यादा स्पष्ट केल्या.

ऑस्ट्रेलियाच्या आव्हानात्मक धावसंख्येला मग दुसऱ्या दिवसअखेर भारताऩ्ो १ बाद १०८ असे जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मुरली विजय (५५) आणि चेतेश्वर पुजारा (२५) मैदानावर असून, भारतीय संघ आणखी ४२२ धावांनी पिछाडीवर आहे.

ऑस्ट्रेलियाचा २५ वर्षीय कप्तान स्मिथने आपल्या रौप्यमहोत्सवी कसोटीत अनेक महत्त्वपूर्ण नजराणे पेश केले. सकाळच्या सत्रात स्मिथने सर्वप्रथम आपल्या कसोटी कारकीर्दीतील दोन हजार धावांचा टप्पा पार केला. मग त्याने आपले सातवे कसोटी शतक चौकार ठोकून साकारले. या शतकाचे आणखी काही पैलू आहेत. भारताविरुद्धच्या मालिकेतील तिसऱ्या कसोटीतले हे तिसरे शतक आहे. ही तिन्ही शतके त्याने पहिल्या डावात झळकावली आहेत. याचप्रमाणे कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पहिल्या दोन्ही सामन्यांत शतके झळकावत त्याने विजय हजारे, जॅकी मॅकग्लीव, सुनील गावस्कर आणि अ‍ॅलिस्टर कुक यांच्या पंक्तीत स्थान मिळवले आहे. मजल दरमजल करीत स्मिथ द्विशतकाकडे वाटचाल करीत होता. परंतु उमेश यादवने त्याचा त्रिफळा उडवला आणि दुर्दैवाने आठ धावांनी त्याचे द्विशतक हुकले. स्मिथने ३०५ चेंडूंत १५ चौकार आणि २ षटकारांनिशी १९२ धावा केल्या. सकाळी पहिल्या तासाभराच्या खेळात नव्या चेंडूचा उपयोग करण्यात इशांत शर्मा (०/१०४) आणि उमेश यादव (३/१३०) अपयशी ठरले. परंतु ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी मात्र धावांचा वेग वाढवला. मोहम्मद शमी (४/१३८) भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. अखेर हॅडिन शमीच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षक धोनीकडे झेल देऊन माघारी परतला. मग मिचेल जॉन्सनने (२८) स्मिथला साथ दिली. ऑफ-स्पिनर आर. अश्विनने (३/१३४) आपल्या फिरकीचा प्रभाव दाखवला आणि धोकादायक जॉन्सनचा अडसर दूर केला.

दुसऱ्या सत्रात स्मिथला रयान हॅरिसच्या रूपात आणखी एक चांगला भागीदार भेटला. या जोडीने आठव्या विकेटसाठी १०६ धावांची भागीदारी केली. हॅरिसने कसोटी कारकीर्दीतील तिसरे अर्धशतक साजरे केल्यानंतर अश्विनने त्याला पायचीत केले.

मग भारताच्या डावात याच हॅरिसने सलामीवीर शिखर धवनला (२८) तंबूची वाट दाखवली. दुसऱ्या स्लिपमध्ये स्मिथने त्याचा अप्रतिम झेल टिपला. त्यानंतर मुरली आणि पुजारा जोडीने नाबाद ५३ धावांची भागीदारी करून भारताचा डाव सावरला. पुजाराला १२ धावांवर असताना जोश हॅझलवूडच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षक ब्रॅड हॅडिनने जीवदान दिले.

पहिल्या दिवसअखेर आम्ही मजबूत स्थितीत होतो. मात्र दुसऱ्या दिवशी आम्ही स्वैर मारा केला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने धावांचा डोंगर उभारला. मात्र आम्हीही या धावसंख्येला सक्षमपणे प्रत्युत्तर देऊ. आम्हाला उर्वरित फलंदाजांना झटपट बाद करायचे होते. मात्र स्टीव्हन स्मिथने सुरेख फलंदाजी केली. फलंदाजांना अनुकूल खेळपट्टीवर पाचशे धावा होणे कठीण नाही. आम्हीही शंभर धावा झटपट केल्या आहेत आणि रविवारी त्यात वेगाने भर घालू.
– रविचंद्रन अश्विन, भारताचा फिरकी गोलंदाज

भारतीय संघ आमच्या खेळासमोर निरुत्तर ठरला. ६ बाद २५९ अशा स्थितीतून आम्ही पाचशेचा टप्पा ओलांडू शकलो याचे समाधान आहे. मिचेल जॉन्सन आणि रयान हॅरिस यांनी चांगली फलंदाजी करत भारतीय गोलंदाजांवर आक्रमण केले. ब्रॅड हॅडिननेही सकारात्मक फलंदाजी केली. मी संथ सुरुवात केली. भारतीय गोलंदाजांच्या स्वैर आक्रमणाचा आम्हाला फायदाच झाला.
– स्टीव्हन स्मिथ, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार

सिडनी कसोटीतून मिचेल मार्शची माघार
सिडनी येथे होणाऱ्या भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यातून ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्शने दुखापतीमुळे माघार घेतली आहे. ऑस्ट्रेलियाचे फिजिओथेरपिस्ट अ‍ॅलेक्स काऊंटोरिस यांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्शच्या मांडीचा स्नायू दुखावल्यामुळे तो या कसोटीसाठी उपलब्ध नसेल. आता तिरंगी एकदिवसीय क्रिकेट स्पध्रेपर्यंत या दुखापतीतून सावरणे हे मार्शपुढे आव्हान असेल.

दुखापतीमुळे वॉर्नरने क्षेत्ररक्षण टाळले
गाबा कसोटी सामन्यातील सराव सत्रात पीटर सिडलचा चेंडू डेव्हिड वॉर्नरच्या डाव्या अंगठय़ावर लागला होता. या दुखापतीमुळे वॉर्नर शनिवारी क्षेत्ररक्षणासाठी मैदानावर येऊ शकला नाही. त्याच्या ऐवजी सिडल बदली खेळाडू म्हणून मैदानावर आला.

धावफलक
ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : ख्रिस रॉजर्स झे. धोनी गो. शमी ५७, डेव्हिड वॉर्नर झे. धवन गो. यादव ०, शेन वॉटसन पायचीत गो. अश्विन ५२, स्टिव्हन स्मिथ त्रिफळा गो. यादव १९२, शॉन मार्श झे. धोनी गो. शमी ३२, जो बर्न्‍स झे. धोनी गो. यादव १३, ब्रॅड हॅडिन झे. धोनी गो. शमी ५५, मिचेल जॉन्सन यष्टिचीत धोनी गो. अश्विन २८, रयान हॅरिस पायचीत गो. अश्विन ७४, नॅथन लिऑन त्रिफळा गो. शमी ११, जोश हॅझलवूड नाबाद ०, अवांतर (बाइज १, लेग बाइज ९, वाइड १, नो बॉल ५) १६, एकूण १४२.३ षटकांत सर्व बाद ५३०.
बाद क्रम : १-०, २-११५, ३-११५, ४-१८४, ५-२१६, ६-३२६, ७-३७६, ८-४८२, ९-५३०, १०-५३०
गोलंदाजी : इशांत शर्मा ३२-७-१०४-०, उमेश यादव ३२.३-३-१३०-३, मोहम्मद शमी २९-४-१३८-४, आर. अश्विन ४४-९-१३४-३, मुरली विजय ५-०-१४-०.
भारत (पहिला डाव) : मुरली विजय खेळत आहे ५५, शिखर धवन झे. स्मिथ गो. हॅरिस २८, चेतेश्वर पुजारा खेळत आहे २५, एकूण ३७ षटकांत १ बाद १०८
बाद क्रम : १-५५
गोलंदाजी : मिचेल जॉन्सन ९-३-२४-०, रयान हॅरिस ७-३-१९-१, जोश हॅझलवूड ९-४-१९-०, शेन वॉटसन ४-०-१४-०, नॅथन लिऑन ८-०-३२-०.