दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार ग्रॅमी स्मिथ शुक्रवारपासून पाकिस्तानविरुद्धच्या कसोटीच्या निमित्ताने कर्णधारपदाची शंभरी साजरी करणार आहे. १००व्या कसोटीत संघाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळणारा स्मिथ कसोटी क्रिकेटमधला पहिला खेळाडू ठरणार आहे. योगायोगाने स्मिथचा ३२वा वाढदिवस या दिवशीच असल्याने शंभरीचा आनंद द्विगुणित होणार आहे.
 स्मिथने आतापर्यंत ९८ कसोटीत दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधित्व केले आहे तर एका कसोटीत जागतिक संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी भूषवली आहे.
स्मिथच्या कारकीर्दीतील या ऐतिहासिक क्षणाच्या निमित्ताने क्रिकेट साऊथ आफ्रिकेने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. चाहत्यांना या कार्यक्रमात सहभागी करण्यात येणार आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाच्या भव्य जर्सीवर स्वाक्षऱ्या गोळा करण्यात येणार आहे. सामन्याच्या दिवशी फिरत्या कॅमेऱ्याद्वारे चाहत्यांचे शुभेच्छा संदेश मोठय़ा पडद्यावर दाखवले जाणार आहेत.
‘स्मिथ दक्षिण आफ्रिकेचा हिरो आहे. २००३ विश्वचषकानंतर अत्यंत कठीण परिस्थितीत स्मिथने संघाचे नेतृत्व स्वीकारले. संघाला अनेक महत्त्वाच्या स्पर्धामध्ये तसेच दौऱ्यांवर विजयपथावर नेण्यात त्याने मोलाची भूमिका बजावली आहे. त्याचे नेतृत्वाने केवळ दक्षिण आफ्रिकेच्या संघाला विजयासाठी प्रेरणा दिली आहे.
कर्णधारपदाची अवघड जबाबदारी सांभाळताना त्याने सलामीच्या फलंदाजाची भूमिकाही समर्थपणे पेलली’, अशा गौरवपूर्ण शब्दांत क्रिकेट साऊथ आफ्रिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक्वेस फॉऊल यांनी सांगितले.