भारताचा विश्वविजेता ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद याला नेदरलँड्सच्या इव्हान सोकोलोव याने बरोबरीत रोखले आणि टाटा स्टील आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत अनपेक्षित धक्का दिला. या बरोबरीमुळे आनंद हा पुन्हा दुसऱ्या स्थानावर फेकला गेला.
आठव्या फेरीअखेर आनंदचे साडेपाच गुण झाले आहेत. जागतिक क्रमवारीतील अग्रमानांकित खेळाडू मॅग्नुस कार्लसन याने रशियाच्या सर्जी कर्झाकिन याच्यावर मात करीत आघाडीस्थान राखले आहे. त्याचे सहा गुण झाले आहेत. अन्य लढतीत इटलीच्या फॅबिआनो कारुआना याने नेदरलँड्सच्या एर्विन एलअमी याला पराभूत केले. अर्मेनियाच्या लिवॉन आरोनियन याने स्पर्धेतील एकमेव महिला खेळाडू यिफान होऊ या चीनच्या खेळाडूवर आकर्षक विजय मिळविला. भारताचा ग्रँडमास्टर पी.हरिकृष्ण याने हंगेरीच्या पीटर लेको याच्याविरुद्धच्या डावात बरोबरी स्वीकारली. त्याचे आता साडेचार गुण झाले आहेत. नेदरलँड्सच्या अनीष गिरी यानेही बचावात्मक खेळ करीत चीनच्या वाँग हाओ याच्याविरुद्धचा डाव बरोबरीत ठेवला. अमेरिकेचा अव्वल दर्जाचा खेळाडू हिकारु नाकामुरा याने स्थानिक खेळाडू लोएक व्हॅनव्हेली याच्याविरुद्ध पराभवाच्या छायेतून डाव अनिर्णीत ठेवण्यात यश मिळविले.