भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) जगातील सर्वात श्रीमंत संस्था बनविणारे जगमोहन दालमिया दहा वर्षांनंतर अध्यक्षपदावर पुन्हा विराजमान झाले. सोमवारी झालेल्या बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षपदाचे एकमेव उमेदवार दालमिया यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल़े  एन. श्रीनिवासन यांचे विश्वासू प्रशासक संजय पटेल यांना हिमाचल प्रदेश क्रिकेट संघटनेचे प्रमुख अनुराग ठाकूर यांच्याकडून धक्कादायक पराभव पत्करावा लागला़  ठाकूर यांनी अवघ्या एका मताने पटेल यांना पराभूत केल़े  
इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (आयपीएल) झालेल्या स्पॉट-फिक्सिंग आणि सट्टेबाजी प्रकरणात तत्कालिन अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचे हितसंबंध गुंतल्याचा ठपका ठेवत सर्वोच्च न्यायालयाने त्यांना निवडणुकीपासून दूर राहण्याचे आदेश दिले होत़े त्यामुळे दालमियांच्या मार्गात माजी अध्यक्ष शरद पवार यांचा अडथळा होता़ मात्र, पूर्व विभागाकडून कोणताही प्रस्ताव न मिळाल्याने पवारांनीही माघार घेतली आणि दालमिया यांचा विजय निश्चित झाला़  सोमवारी त्यांची अधिकृत घोषणा करण्यात आली़
झारखंड क्रिकेट असोसिएशनचे अमिताभ चौधरी यांनी सहसचिवपदासाठी श्रीनिवासन गटाचा पाठिंबा असलेल्या गोव्याच्या चेतन देसाई यांचा पराभव केला़  कोषाध्यक्षपदासाठी हरयाणाच्या अनिरुद्ध चौधरी यांनी १६-१३ अशा फरकाने आयपीएलचे माजी अध्यक्ष राजीव शुक्ला यांना पराभवाचा धक्का दिला़   

अशी आहे कार्यकारिणी
अध्यक्ष : जगमोहन दालमिया
उपाध्यक्ष : एम़ एल़ नेहरू  (उत्तर), डॉ़  जी़ गंगा राजू (दक्षिण), गौतम रॉय (पूर्व), टी़ सी, मॅथ्युज (पश्चिम), सी के खन्ना (मध्य), सचिव : अनुराग ठाकूर, सहसचिव : अमिताभ चौधरी, खजिनदार : अनिरुद्ध चौधरी

बीसीसीआय ही एन. श्रीनिवासन यांच्या इशाऱ्यावर चालणारी संस्था नसल्याचे रविवारी पार पडलेल्या निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट झाले आहे. मी ही निवडणूक  लढविण्याचा प्रश्नच येत नाही़  बीसीसीआयच्या घटनेनुसार यंदा अध्यक्षपदाची दावेदारी पूर्व विभागाकडे होती आणि त्याच विभागातून कुणी तरी निवडणूक लढविणे अपेक्षित होत़े  – शरद पवार, बीसीसीआयचे माजी अध्यक्ष