भारताच्या सोमदेव देववर्मन व युकी भांब्री या डेव्हिसपटूंनी सफाईदार विजय मिळवत केपीआयटी चॅलेंजर टेनिस स्पर्धेत दुसऱ्या फेरीकडे वाटचाल केली.
शिवछत्रपती क्रीडानगरीत सुरू असलेल्या या स्पर्धेत सोमदेव या तिसऱ्या मानांकित खेळाडूने स्थानिक खेळाडू अर्जुन कढे याचा ६-१, ६-३ असा केवळ एक तासात पराभव केला. सोमदेव याने फोरहँडच्या ताकदवान फटक्यांचा बहारदार खेळ केला. तसेच त्याने नेटजवळून प्लेसिंगचाही कल्पकतेने उपयोग केला. भांब्री याने चीन तैपेईचा खेळाडू लियांग चिहुआंग याच्यावर ६-३, ६-० असा दणदणीत विजय नोंदविला. त्याने बॅकहँडच्या ताकदवान फटक्यांचा उपयोग करीत लियांगला फारशी संधी दिली नाही.मिश्र दुहेरीत आशियाई सुवर्णपदक मिळविणारा साकेत मायनेनी याने फ्रान्सच्या फॅब्रिस मार्टिन याचा ६-२, ६-२ असा दणदणीत पराभव केला. सनम सिंग याने इटलीच्या स्टीफानो त्रेव्हेग्लिआ याच्याविरुद्ध पहिल्या सेटमध्ये ५-२ अशी आघाडी घेतली असताना स्टीफानो याचा पायाच्या घोटय़ाला दुखापत झाली. त्यामुळे त्याने माघार घेत सनम याला विजय बहाल केला.
पात्रता फेरीतून मुख्य फेरीत स्थान मिळविलेल्या विजयसुंदर प्रशांत याला उदयोन्मुख खेळाडू एस.के.मुकुंद याच्याविरुद्ध ७-६ (८-६), ३-६, ६-१ असा विजय मिळविताना झगडावे लागले. हा सामना दोन तास चालला होता. आशियाई कांस्यपदक विजेता युईची सुगिता या जपानच्या खेळाडूला भारताचा १९ वर्षीय खेळाडू रामकुमार रामनाथन याने कौतुकास्पद लढत दिली. चुरशीने झालेला हा सामना सुगिता याने ७-५, ७-६ (७-४) असा जिंकला. अनुभवाचा फायदा घेत चौथ्या मानांकित सुगिता याने दुसऱ्या सेटमधील टायब्रेकरमध्ये सव्‍‌र्हिस व परतीचे फटके यावर नियंत्रण ठेवीत विजयश्री मिळविली.
भारताच्या पुरव राजा याला बेल्जियमच्या किमेर कोपीजान्स याने ६-४, ७-६ (७-५) असे हरविले.