भारताचा अव्वल दर्जाचा खेळाडू सोमदेव देववर्मनने एकेरीबरोबरच दुहेरीतही पराभव पत्करत केपीआयटी एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेत निराशा केली. साकेत मायनेनी व युकी भांब्री यांनी एकेरीत आव्हान राखले.
शिवछत्रपती क्रीडानगरीत सुरू असलेल्या या स्पर्धेत सोमदेवला एकेरीत झेक प्रजासत्ताकच्या अ‍ॅडम पावल्हासेकने ६-३, ७-६ (७-३) असे पराभूत करीत उपांत्यपूर्व फेरी गाठली. भांब्रीने बेल्जियमच्या गेर्मन गियुनोन याच्यावर ७-५, ६-४ अशी मात केली. मायनेनी याने जपानच्या हिरोकी मोरिया याचा ६-१, ६-२ असा दणदणीत पराभव केला. सोमदेव याला अ‍ॅडमविरुद्ध अपेक्षेइतका सूर गवसला नाही. त्याला परतीचे फटके व सव्‍‌र्हिसवर नियंत्रण ठेवता आले नाही. पहिल्या सेटमध्ये त्याची सव्‍‌र्हिस छेदली गेली. अ‍ॅडमने पासिंग शॉट्सचा बहारदार खेळ करीत त्याची सव्‍‌र्हिस सहजपणे परतविली. दुसऱ्या सेटमध्ये सोमदेवने टायब्रेकपर्यंत चांगली झुंज दिली. तथापि, टायब्रेकरमध्ये पुन्हा अ‍ॅडमने त्याच्या सव्‍‌र्हिसवर ताकदवान फटके मारले. टायब्रेकर ७-३ असा सहज घेत त्याने सामनाही जिंकला.
सोमदेव व विजयसुंदर प्रशांत यांना दुहेरीत अव्वल मानांकित सांचाई व सोंचात रतिवाताना यांच्याविरुद्ध पराभवास सामोरे जावे लागले. त्यांनी हा सामना ६-७ (४-७), ३-६ असा गमावला. भारताच्या सनम सिंगला स्पेनच्या आद्रियन मेनेन्डेझ याने ६-१, ६-२ असे हरविले. विष्णू वर्धन याची विजयी घोडदौड आठव्या मानांकित किमेर कोपीजान्स या स्पॅनिश खेळाडूने संपुष्टात आणली. त्याने हा सामना ६-२, ३-६, ६-३ असा जिंकला. विजयसुंदर प्रशांत यालाही पराभवास सामोरे जावे लागले. त्याला द्वितीय मानांकित अ‍ॅलेक्झांडर कुद्रीत्सेव याने ६-०, ७-६ (७-५) असे हरविले.