अव्वल दर्जाचा खेळाडू सोमदेव देववर्मन याने पहिला सेट गमावल्यानंतर बहारदार खेळ करीत युकी भांब्रीवर मात करीत दिल्ली ओपन टेनिस स्पर्धेत विजेतेपद राखले. हा सामना त्याने ३-६, ६-४, ६-० असा जिंकला.
भारताच्या या दोन्ही तुल्यबळ खेळाडूंमध्ये झालेल्या या सामन्यात शेवटपर्यंत चुरस राहील अशी अपेक्षा होती, मात्र शेवटचा सेट एकतर्फीच झाला. तरीही दोन्ही खेळाडूंनी केलेल्या आक्रमक खेळामुळे हा सामना गाजला. सोमदेव याने पहिला सेट गमावला. पाठोपाठ दुसऱ्या सेटमध्ये तो ०-२ असा पिछाडीवर होता. मात्र तेथून त्याने सव्‍‌र्हिस व परतीचे फटके यावर नियंत्रण ठेवत विजेतेपद खेचून आणले.
दोन्ही खेळाडूंनी बेसलाइनवरून खेळण्यास प्राधान्य दिले होते. पहिल्या सेटमध्ये युकी याने परतीचे सुरेख फटके मारून सोमदेवची सव्‍‌र्हिस तोडण्यात यश मिळविले. दुसऱ्या सेटमध्येही त्याने सव्‍‌र्हिसब्रेक मिळवत २-० अशी आघाडी घेतली होती, मात्र नंतर त्याने केलेल्या अक्षम्य चुकांचा सोमदेव याला फायदा झाला. त्याने तिसऱ्या गेममध्ये सव्‍‌र्हिसब्रेक मिळविला. तेथून त्याने खेळावर नियंत्रण मिळविले. पुन्हा त्याने आणखी एकदा सव्‍‌र्हिसब्रेक मिळविला. या ब्रेकच्या आधारे त्याने हा सेट घेत सामन्यात १-१ अशी बरोबरी केली. तिसऱ्या सेटमध्ये सोमदेव याच्या वेगवान खेळापुढे युकीचा बचाव निष्प्रभ ठरला. तीन वेळा युकीने सव्‍‌र्हिस गमावली. हा सेट एकतर्फी घेत सोमदेवने विजेतेपदावर मोहोर नोंदविली.
दुहेरीत इगोर गेरासिमोव्ह व अ‍ॅलेक्झांडर कुद्रियात्सेव यांनी रिचर्ड घेडीन व तोशिहीडे मत्सुई यांच्यावर ६-७ (५-७), ६-४, १०-६ अशी मात करीत विजेतेपद पटकाविले.