दक्षिण कोरियावर मात करून भारतीय संघाने डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेच्या जागतिक गटाच्या प्ले-ऑफ फेरीत मजल मारत इतिहास घडवला आहे. भारताच्या या विजयाचा शिल्पकार ठरला तो सोमदेव देववर्मन. एकेरीचा पहिला सामना जिंकल्यानंतर पुन्हा परतीच्या एकेरीत विजय मिळवून सोमदेवने भारताला आशिया-ओशियाना गट-१मधील दक्षिण कोरियाविरुद्धच्या लढतीत ३-१ असा विजय मिळवून दिला.
सोमदेवने परतीच्या एकेरीत कोरियाच्या योंग क्यू-लिम याच्यावर अटीतटीच्या रंगलेल्या सामन्यात ६-४, ५-७, ६-३, ६-१ असा विजय प्राप्त केला. भारताने विजयी आघाडी घेतल्यामुळे महत्त्वपूर्ण नसलेला परतीच्या एकेरीतील दुसरा सामना रद्द करण्यात आला. सोमदेवच्या या कामगिरीचे भारतीय संघातील टेनिसपटूंनी भरभरून कौतुक केले आहे. ‘‘सोमदेवची अद्वितीय कामगिरी. त्याच्या अप्रतिम कामगिरीमुळे भारताला कोरियावर विजय साकारता आला,’’ असे सनम सिंगने म्हटले आहे.
भारताचा एकेरीतील अव्वल टेनिसपटू असलेल्या सोमदेवची कधीही हार न मानण्याची वृत्ती या सामन्यात पुन्हा पाहायला मिळाली. कोरियाच्या अव्वल खेळाडूविरुद्ध सोमदेवने पहिल्या दोन सेटमध्ये झुंजार खेळाचे प्रदर्शन केले. लिमने पहिल्या सामन्यात सनम सिंगला हरवले होते. पण सोमदेवविरुद्ध तो निष्प्रभ ठरला. पहिला सेट सोमदेवने जिंकल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये लिमने विजय मिळवून सामन्यात बरोबरी साधली. पण नंतरचे दोन्ही सेट सोमदेवने सहज आपल्या नावावर करत भारताच्या विजयावर मोहोर उमटवली.
या विजयासह भारताने कोरियाविरुद्धची कामगिरी ४-६ अशी सुधारली आहे. भारताच्या युवा संघाने डेव्हिस चषकातील याआधीच्या सामन्यात  तैपेईवर ५-० असा विजय मिळवला होता. त्यामुळे आत्मविश्वासात असलेल्या कोरियाला नमवणे भारताला जड गेले नाही.