एटीपी स्पर्धावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी न होण्याचा भारताचा अव्वल टेनिसपटू सोमदेव देववर्मनचा निर्णय चुकीचा असल्याची टीका अखिल भारतीय टेनिस संघटनेने (आयटा) केली आहे.
‘‘सोमदेवचाहा निर्णय निराशाजनक आहे. सोमदेव देशातला अव्वल खेळाडू आहे. त्यामुळे तो या स्पर्धेत खेळून देशाला पदक मिळवून देईल, अशी आम्हाला आशा होती. तो किमान सांघिक प्रकारात खेळेल याची खात्री होती. मात्र त्याने आडमुठे धोरण स्वीकारले,’’ असे मत ‘आयटा’चे सरचिटणीस भरत ओझा यांनी व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले, ‘‘आम्ही यासंदर्भात आनंद अमृतराज आणि प्रशिक्षक झिशान अली यांच्याशी चर्चा केली. सांघिक प्रकारात भारताला पदकाची आशा आहे. सर्वोत्तम खेळाडू भारतासाठी खेळतील अशा अपेक्षा होती. आम्ही कोणावरही सक्ती करत नाही. आम्ही फक्त विनंती करू शकतो. आम्ही सरकारला बांधील आहोत, जे सोमदेवच्या निर्णयाला आक्षेप घेऊ शकतात.’’
‘‘आशियाई स्पर्धेत तीन आठवडे खेळून फायदा होणार नाही. त्यापेक्षा मी अव्वल १०० खेळाडूंमध्ये स्थान मिळवण्यास प्राधान्य देईन. मात्र माझ्या या निर्णयावरून कुणीही माझ्या देशप्रेमाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करू नये. डेव्हिस चषकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना आम्ही जीवाचे रान करत असतो,’’ अशा शब्दांत सोमदेवने टीकाकारांना चोख उत्तर दिले.