शरीरसौष्ठव हा देशातला एक प्रसिद्ध खेळ. एखाद्या गल्लीत जरी स्पर्धा झाली तरी ५-१० हजार चाहते जमतात. जगात एकच गोष्ट कायम आहे आणि ती म्हणजे बदल. जे बदलतात ते टिकून राहतात, हे साऱ्यांनाच ज्ञात आहे. भारतीय शरीरसौष्ठवमध्ये काही बदल गेल्या पाच वर्षांपासून व्हायला सुरुवात झाली आहे. हा बदल म्हणजे फिजिक फिटनेस. गेल्या पाच वर्षांमध्ये हे क्षेत्र झपाटय़ाने वाढले आहे. फक्त खेळाडूंच्या दृष्टीने नाही तर प्रसिद्धी, वलय, पैसा या साऱ्याच आघाडय़ांवर. त्यामुळे सध्याची तरुणाई या क्षेत्राकडे मोठय़ा प्रमाणात वळत आहे. सध्याच्या घडीला युवा पिढीचा कल हा शरीरसौष्ठवपेक्षा फिजिक फिटनेसकडे वळत असल्याचे प्रकर्षांने जाणवते. काही महिन्यांपूर्वी झालेल्या जागतिक स्पर्धेत भारताचा जवळपास ६० जणांचा ताफा सहभागी झाला होता, यामधील निम्मे खेळाडू फिजिक फिटनेस या प्रकारात सहभागी झाले होते.

‘‘गेल्या पाच वर्षांपूर्वी फक्त शरीरसौष्ठव जास्त दिसायचे; पण सध्याच्या घडीला फिजिक फिटनेस प्रकारामध्ये कमालीची वाढ झालेली आहे. सध्या शरीरसौष्ठवपासून तंदुरुस्तीकडे भरपूर तरुण वळत आहेत. या प्रकारात एवढे खेळाडू सहभाग घेत आहेत की, या प्रकाराची वेगळी स्पर्धा करण्याची गरज आहे आणि तसा प्रस्तावही आम्ही केला आहे. त्यामुळे पुढील वर्षांपासून फिजिक फिटनेसची वेगळी स्पर्धा होऊ शकेल. मोठय़ा व्यावसायिक संस्थाही या खेळाकडे वळायला सुरुवात झाली आहे; पण फिजिक फिटनेसमुळे शरीरसौष्ठव या खेळाला कोणताही धोका नाही,’’ असे भारतीय शरीरसौष्ठपटू महासंघाचे महासचिव चेतन पाठारे यांनी सांगितले.

सध्या भारताची सोनाली स्वामी ही सर्वात फॉर्मात असलेली खेळाडू आहे. गेल्या वर्षी झालेल्या जागतिक स्पर्धेत तिने कांस्यपदक पटकावले होते. या खेळाबद्दल सोनाली म्हणाली की, ‘‘मी स्पोर्ट्स मॉडेल या प्रकारात गेल्या चार वर्षांपासून खेळत आहे. चार वर्षांपूर्वी जास्त महिला या खेळात नव्हता, पण या घडीला महिला खेळाडूंमध्ये कमालीची वाढ झाली आहे. माझे वय ४१ वर्षे आहे, मला दोन मुले आहेत. हे पाहिल्यावर बऱ्याच विवाहित आणि आई झालेल्या महिलादेखील या खेळाकडे वळू शकतील. खेळाला वयाचे बंधन नसते, हे यामधून दिसून येऊ शकते. सध्या प्रत्येकाला तंदुरुस्त राहायचे आहे आणि प्रत्येकाला शरीरसौष्ठव होणे जमत नाही. त्यांच्यासाठी फिजिक फिटनेस हा चांगला पर्याय आहे. आता सुवर्णपदकाचे ध्येय मी डोळ्यांपुढे ठेवले आहे.’’

‘‘ज्यांना फार कमी कालावधीमध्ये शरीरप्रदर्शन करायचे आहे त्यांच्यासाठी फिजिक फिटनेस हा प्रकार आहे. शरीरसौष्ठव होण्यासाठी नाकापासून टाचेपर्यंत व्यायाम करावा लागतो. सुरुवातीला सूर्यनमस्कार, बैठका महिनाभर केल्यानंतर मशीनचा व्यायाम सुरू होतो; पण फिजिक फिटनेस करणारा खेळाडू हा पहिल्या दिवसापासून मशीनचा व्यायाम करतो. फिजिक फिटनेसमध्ये कंबरेवरील शरीरसंपदा कमावली की पुरेसे ठरते; पण कोणत्याही प्रकारच्या तंदुरुस्तीसाठी पाय आणि त्याचे व्यायाम महत्त्वाचे असतात. फिजिक फिटनेसमधील खेळाडूंना आपण पूर्णपणे तंदुरुस्त आहोत, असे वाटते. कारण त्यांना फक्त वलय हवे असते; पण शरीराचा पाया पाय असतात, हे विसरून कधीही चालणार नाही,’’ असे भारतीय शरीरसौष्ठव महासंघाचे महासचिव सुरेश कदम सांगत होते.

फिजिक फिटनेस प्रकारात महाराष्ट्राच्या मनोज पाटीलने महाराष्ट्र आणि राष्ट्रीय स्पर्धामध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. फिजिक फिटनेसबद्दल मनोजने सांगितले की, ‘‘पूर्वी मीदेखील शरीरसौष्ठवपटू होतो; पण हा खेळ पाहिला आणि हाच खेळ माझ्यासाठीच असल्याचे मला वाटले. या प्रकारात तुम्हाला फक्त चांगले शरीर कमावून चालत नाही, तर तुमची वेशभूषा, केशरचना आणि चेहऱ्यावरील हावभावही महत्त्वाचे असतात. त्यामुळे सध्या युवा पिढी याकडे वळताना दिसत आहे; पण याचा शरीरसौष्ठावर विपरीत परिणाम होणार नाही. उलट शरीरसौष्ठवाला याची मदतच होईल. शरीरसौष्ठवाएवढीच मेहनत या खेळासाठीही लागते; पण लोकांना या खेळाचे अधिक आकर्षण निर्माण झाले आहे. त्यामुळे समाजमाध्यमांवरदेखील हा खेळ प्रसिद्ध होत चालला आहे. त्यामुळे या खेळाला चांगले भविष्य आहे. आता यापुढे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उंचावण्याचा माझा प्रयत्न असेल.’’

‘‘शरीरसौष्ठव खेळाला ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळावे, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय, आशियाई आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनांशी आमचा संवाद सुरू आहे. सध्या १९५ देशांमध्ये हा खेळ खेळला जातो; पण खेळाचे ठोस असे नियम नाहीत. त्यामुळे सध्या आम्ही खेळाचे नियम कसे असावेत, याचा अभ्यास करत आहोत. जर हा खेळ ऑलिम्पिकमध्ये खेळवायचा असेल तर त्यासाठी फिजिक फिटनेसची भूमिका महत्त्वाची असेल. उंची आणि वजन यांच्यामध्ये कसा समन्वय असावा आणि हा खेळ अधिक साचेबद्ध कसा करता येईल, हे आम्ही पाहत आहोत. फिजिक फिटनेसचे प्रमाण गेल्या काही वर्षांमध्ये वाढत आहे; पण फिजिक फिटनेस हा प्रकार कधीच शरीरसौष्ठवसाठी मारक ठरणार नाही, तर तो पोषकच असेल,’’ असे भारतीय शरीरसौष्ठव आणि फिटनेस महासंघाचे महासचिव संजय मोरे यांनी सांगितले.

क्रिकेटमध्ये जसा ट्वेन्टी-२० सारखा प्रकार आहे तसा शरीरसौष्ठवमध्ये फिजिक फिटनेस आहे, असे आपण म्हणू शकतो, कारण या प्रकारात खेळण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागत नाही. तुम्ही कंबरेच्या वर चांगले शरीर कमावले तर ते यासाठी पुरेसे असू शकते. त्याचबरोबर शरीर जास्त पीळदार असणेही गरजेचे नाही. शरीरसौष्ठवसारखा जास्त आहारही लागत नाही. या धावत्या जगात शरीरसौष्ठव करायला जास्त वेळ देण्यापेक्षा, जास्त श्रम घेण्यापेक्षा फिजिक फिटनेस हा प्रकार बऱ्याच जणांना आपलासा वाटू लागला आहे. युवा पिढी या प्रकाराकडे जास्त प्रमाणात वळते आहे. प्रसिद्धी आणि वलयही शरीरसौष्ठवपेक्षा जास्त मिळत आहे. त्यामुळे कमी वेळात, खर्चात हा खेळ प्रकार बहुतांशी लोकांना आपलासा वाटत आहे. हा खेळ प्रकार शरीरसौष्ठवाला मारक ठरणार नाही, असे जाणकार म्हणत आहेत; पण सध्याचे युग पाहता फिजिक फिटनेस हे वलय, पैसा, प्रसिद्धी यांचा विचार करता शरीरसौष्ठवपेक्षा मोठे होऊ शकते; पण शरीरसौष्ठव या खेळाची सर फिजिक फिटनेसला येऊ शकत नाही, कारण शरीरसौष्ठवसारखा परिपूर्ण दुसरा प्रकार नाही.

फिजिक फिटनेस म्हणजे काय?

फिजिक फिटनेस हे पुरुष आणि महिला या दोन्ही गटांत खेळवले जाते. भारतामध्ये पुरुषांपेक्षा महिलांचे प्रकार जास्त आहेत.

  • ’ अ‍ॅथलेटिक्स स्पोर्ट्स : हा प्रकार शरीरसौष्ठवच्या थोडाफार जवळ जाणारा आहे. यामध्ये शरीरातील स्नायू पीळदार असायला हवेत. त्याचबरोबर शरीर किती तंदुरुस्त आहे, हे पाहायला मिळणे गरजेचे आहे.
  • ’ मॉडेल फिजिक : यामध्ये शरीर पीळदार नसले तरी चालू शकते, पण शरीर आकर्षक असणे गरजेचे आहे. यामध्ये पोटाचा भाग सपाट असावा लागतो. त्याचबरोबर तुमची शैली आणि देहबोलीही महत्त्वाची ठरते.
  • ’ फिटनेस स्पोर्ट्स : हा प्रकार म्हणजे अ‍ॅथलेटिक्स आणि मॉडेल या प्रकाराचे मिश्रण आहे. यामध्ये शरीर एका खेळाडूसारखे आणि त्याचबरोबर आकर्षक असणे गरजेचे आहे.

 

प्रसाद लाड

prasad.lad@expressindia.com