सर्वोच्च न्यायालयाच्या समितीच्या निर्णयाचा अभ्यास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या चार सदस्यीय कार्यगटामध्ये भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची नियुक्ती करण्यात आली आहे. हा कार्यगट सहा आठवडय़ांमध्ये समितीच्या निर्णयाचा अभ्यास करून अहवाल सादर करणार आहे, त्याचबरोबर आगामी आयपीएलमध्ये आठ संघ कसे आणि कोणते खेळवता येऊ शकतात, याबाबत हा कार्य गट शिफारस करणार आहे.
या गटामध्ये गांगुलीसह आयपीएलच्या संचालन समितीचे अध्यक्ष राजीव शुक्ला, बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर आणि बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अनिरुद्ध चौधरी यांचा समावेश आहे. या गटाला बीसीसीआयच्या कायदेशी सल्लागार यू.एन. बॅनर्जी साहाय्य करतील.
‘‘कार्यगटाला समितीच्या निर्णयावर अभ्यास करून सहा आठवडय़ांमध्ये आपला अहवाल आयपीएलच्या संचालन समितीपुढे सादर करायचा आहे. त्याचबरोबर फ्रँचायजीच्या सहभागधारकांचाही या वेळी विचार करावा लागेल. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी कार्यगट कायदेशील सल्ला घेईल, कारण कायदेशीर अडचणी येऊ नयेत, हा आमचा मानस आहे,’’ असे शुक्ला यांनी सांगितले.
लोढा समितीने चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या दोनही संघांवर दोन वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. त्याचबरोबर एन. श्रीनिवासन यांचा जावई गुरनाथ मयप्पन आणि राजस्थानच्या संघाचा सहमालक राज कुंद्रावर आजीवन बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयांचा अभ्यास करण्यासाठी आयपीएलच्या संचालन समितीने कार्यगटाची स्थापना केली आहे. या समितीमध्ये खेळाडूंचे प्रतिनिधित्व करणारा खेळाडू असावा यासाठी गांगुलीची नियुक्ती करण्यात आली आहे.