भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली पुन्हा एकदा फलंदाजी करताना पाहायला मिळाला. पण यावेळी सौरवने क्रिकेटच्या मैदानात नव्हे, तर कोलकातातील गल्लीबोळात बच्चेकंपनीसोबत क्रिकेटचा आनंद लुटला. कोलकातामध्ये आपल्या राहत्या घरासमोरील गल्लीत सौरवने गल्ली क्रिकेटची मजा घेतली. मैदानात आपल्या जोरकस फटक्यांनी सर्वांचे मनोरंजन करणाऱया सौरवने बच्चे कंपनीच्या गोलंदाजीवर फलंदाजी केली. अर्थात गल्ली क्रिकेटमध्ये जागेची उपलब्धता लक्षात घेऊन सौरव संयमी फलंदाजी करताना पाहायला मिळाला. विशेष म्हणजे, डावखुऱया सौरवने यावेळी उजव्या हाताने फलंदाजी करण्याचा देखील आनंद घेतला. सुरूवातीचे काही चेंडू डाव्या हाताने खेळून काढल्यानंतर सौरवने उजव्या हाताने फलंदाजी केली. त्यामुळे सौरवच्या फलंदाजीचे एक वेगळ रूप यावेळी पाहायला मिळाले. सौरवच्या गल्ली क्रिकेटचे हे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होते आहेत.

भारतीय संघाचे नेतृत्त्व केलेल्या या माजी क्रिकेटपटूने मैदानात प्रसिद्ध ब्रॅण्ड्सच्या बॅटने फलंदाजी केली आहे. पण गल्ली क्रिकेट खेळताना सौरव एका साध्या बॅटने खेळला. सौरवने २००८ साली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावसकर चषकानंतर क्रिकेटला अलविदा केला होता. त्यानंतर गांगुली आयपीएलमध्ये खेळताना दिसला होता. पण त्यानंतर आयपीएलमधूनही सौरवने निवृत्तीचा निर्णय घेतला. क्रिकेटचे मैदान गाजवल्यानंतर सौरव आता बंगाल क्रिकेट असोसिएशनची धुरा सांभाळत आहे. तो बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष आहे.

वाचा: किवींपाठोपाठ इंग्लंडलाही ‘व्हाईट वॉश’ द्या- सौरव गांगुली