भारतीय क्रिकेट संघाला रणजी किंवा तत्सम स्थानिक स्पर्धेतून प्रतिभावंत खेळाडू मिळतात. मात्र सध्याच्या घडीला या खेळाडूंना मिळणारे मानधन फारसे समाधानकारक नाही. यासंदर्भात रणजी स्पर्धेतील कर्णधार आणि प्रशिक्षकांनी मानधन वाढून मिळावे, अशी मागणी केली आहे. या मुद्द्यावर आता बीसीसीआय गांभिर्याने विचार करेल, असे वाटते. कारण भारताचा माजी कर्णधार आणि बंगाल क्रिकेट मंडळाचा अध्यक्ष सौरव गांगुलीने स्थानिक खेळाडूंच्या दुर्लक्षित मुद्याकडे विशेष लक्ष दिलंय. गांगुली स्थानिक स्तरावर खेळणाऱ्या खेळाडूंच्या मानधनात वाढ व्हावी, या मुद्द्यावर आग्रही असल्याचे दिसते. नुकत्याच कोलकातामध्ये बीसीसीआयच्या टेक्निकल टिमसोबत झालेल्या बैठकीत त्याने स्थानिक खेळाडूंच्या मानधनाच्या मुद्द्यावर विशेष चर्चा केली. स्थानिक क्रिकेटमुळेच प्रतिभावंत खेळाडू घडतात. त्यामुळे त्यांच्या मागणीकडे गांभिर्याने लक्ष द्यावे, असे गांगुलीने बीसीसीआयच्या टेक्निकल टिमला सांगितले.

देशांतर्गत स्पर्धेत खेळणाऱ्या खेळाडूंची समस्या नक्की काय आहे? हा प्रश्न गांगुलीने जाणून घेतला. यावेळी स्थानिक क्रिकेटर्सला सध्याच्या घडीला एका सत्रासाठी १० लाख रुपये मानधन मिळते, अशी माहिती त्याला देण्यात आली. ही रक्कम फारच अल्प असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. यावर गांगुलीने हा मुद्दा गांभिर्याने विचार करायला हवा, असे सांगितले. यापूर्वी भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग याने स्थानिक क्रिकेटमधील मानधनात सुधारणा अपेक्षित आहे, असे म्हटले होते. यासंदर्भात त्याने भारताचे माजी प्रशिक्षक कुंबळे यांना पत्रही लिहिले होते. या पत्रामध्ये हरभजनने गेली दोन ते तीन वर्षे रणजी खेळताना सहकाऱ्यांना आर्थिक समस्या अधिक असल्याचे सांगत जगातील श्रीमंत अशा क्रिकेट बोर्डाने त्यांच्याकडे लक्ष द्यावे, असे म्हटले होते.