फलंदाजांनी गाजवलेला पहिला कसोटी सामना अखेर अनिर्णित राखण्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ यशस्वी ठरला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्कच्या नाबाद २५९ धावा आणि मायकेल हसीच्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ५६५ धावांचा डोंगर उभारत पहिला डाव घोषित केला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांची त्यांनी चांगलीच तारांबळ उडवली आणि ऑस्ट्रेलियाचा संघ सामना जिंकण्याच्या जवळपास पोहोचला खरा, पण ए. बी. डी’व्हिलियर्सच्या संयमी खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवले. मायकेल क्लार्कला यावेळी सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
ऑस्ट्रेलियाने १९८८ सालानंतर प्रतिस्पर्धी संघाला या मैदानात जिंकायला दिले नाही आणि तो विक्रम त्यांनी या सामन्यातही अबाधित राखला. मायकेल क्लार्कने तब्बल २६ चौकारांच्या मदतीने नाबाद २५९ धावांची खेळी साकारत संघाला ५६५ धावांचा डोंगर उभारून दिला. हसीने १३ चौकारांच्या मदतीने १०० धावांची खेळी साकारत त्याला चांगली साथ दिली.
आपली बाजू सुरक्षित करत क्लार्कने डाव घोषित करून दक्षिण आफ्रिकेला फलंदाजीला पाचारण केले आणि या डावपेचात तो यशस्वी झाला. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना ठराविक फरकाने बाद करण्याची किमया साधली आणि ते विजयाची स्वप्ने बघू लागले. पण डी’व्हिलियर्सने शांत डोक्याने बचावात्मक पवित्रा घेत सामना अनिर्णित राखण्यात मोलाचा वाटा उचलला. त्याने ११४ चेंडूंचा सामना करत नाबाद २९ धावांची संयमी खेळी साकारली.
 जेम्स पॅटिन्सन आणि नॅथन लिऑन यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.