२०१०च्या फुटबॉल विश्वचषकाचे आयोजनाचे हक्क मिळावे, यासाठी एक कोटी डॉलर्स रुपयांची लाच दिल्याचा आमच्यावरील आरोप बिनबुडाचा आणि तथ्यहीन असल्याचे दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय फुटबॉल संघटनेने म्हटले आहे.
‘‘या आरोपांनी आम्ही नाराज झालो आहोत. या आरोपात तथ्य नाही. कोणत्याही आरोपाला पुराव्यांचा आधार नाही. ज्यांनी आरोप केले आहेत, त्यांनी आमच्याविरुद्धचे पुरावेही सादर करावेत,’’ असे दक्षिण आफ्रिकेच्या फुटबॉल संघटनेचे प्रवक्ते डॉमिनिक चिमहावी यांनी म्हटले आहे.
‘‘आयोजनासाठीच्या आमच्या उपक्रमात दिवंगत राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला, माजी अध्यक्ष थाबो मबेकी आणि अन्य सरकारी मंत्र्यांचा समावेश होता. या सर्व व्यक्ती उच्च नीतीमूल्य पाळणाऱ्या होत्या,’’ असे त्यांनी पुढे सांगितले.