भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने(बीसीसीआय) आयपीएलच्या दहाव्या मोसमाचे वेळापत्रक गुरूवारी जाहीर केले. येत्या ५ एप्रिल ते २१ मे या महिन्याभराच्या कालावधीत भारतात आयपीएलचा रोमांच अनुभवता येणार आहे. पहिला सामना हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर खेळविण्यात येणार आहे, तर स्पर्धेचा अंतिम सामना याच स्टेडियमवर २१ मे रोजी होईल. पण आयपीएलमध्ये सामील होणारे अनेक परदेशी क्रिकेटपटू यावेळी ही स्पर्धा पूर्ण खेळू शकणार नाहीत.

दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज ए.बी.डीव्हिलियर्स, जेपी ड्युमिनी, फॅफ डू प्लेसिस, इंग्लंडचा जोस बटलर यांच्यासह आणखी काही परदेशी खेळाडू आयपीएलची स्पर्धा मध्येच सोडून जाऊ शकतात. खेळाडूंनीही याबाबतची माहिती संघांना दिल्याचे कळते. आयपीएलमध्ये दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेटपटू ७ मे नंतर खेळू शकणार नाहीत, तर इंग्लंडचे खेळाडू १ मे ते १४ मे दरम्यान आयपीएलमध्ये खेळणार नाहीत. हे सर्व खेळाडू त्यांच्या राष्ट्रीय संघात खेळण्यासाठी मायदेशी परतणार आहेत. आयपीएलमध्ये ए.बी.डीव्हिलियर्स, फॅफ डू प्लेसिस, जेपी ड्युमिनी आणि क्विंटन डी कॉक, ख्रिस मॉरीस हे द.आफ्रिकेचे महत्त्वाचे खेळाडू विविध संघांचे प्रतिनिधीत्व करतात. इंग्लंडकडून जोस बटलर, सॅम बिलिंग्ज हे खेळाडू मायदेशी परतण्याची शक्यता आहे.