डेव्हिड मिलरच्या ट्वेन्टी-२० प्रकारातील पहिल्यावहिल्या अर्धशतकाच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-२० लढतीत ३ विकेट्सनी विजय मिळवला.

ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना १५७ धावांची मजल मारली. आरोन फिंचने ४० तर मिचेल मार्शने ३५ धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाच्या सात फलंदाजांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. दक्षिण आफ्रिकेतर्फे इम्रान ताहीरने २१ धावांत ३ बळी घेतले. कागिसो रबाडा आणि डेव्हिड वीस यांनी प्रत्येकी २ बळी घेत ताहीरला चांगली साथ दिली.

प्रत्युत्तरादाखल खेळताना आफ्रिकेने ए बी डी’व्हिलियर्स, क्विंटन डी कॉक आणि जे. पी. डय़ुमिनीला झटपट गमावले. फॅफ डू प्लेसिसने ४० धावांची खेळी करत विजयाचा पाया रचला. फॅफ बाद झाल्यानंतर डेव्हिड मिलरने सामन्याची सूत्रे हाती घेतली. सहकारी नियमित अंतरात बाद होत असतानाही मिलरने ३५ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद ५३ धावांची खेळी साकारत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. ऑस्ट्रेलियातर्फे नॅथन कोल्टर-नीलने ३ बळी घेतले.

मिलरलाच सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.