विश्वचषकात उपांत्य फेरीत कच खाण्याच्या वृत्तीमुळे दक्षिण आफ्रिकेच्या संघावर ‘चोकर्स’ हा शिक्का लागला होता. परंतु बुधवारी न्यूझीलंडविरुद्ध प्रयत्नांची शिकस्त करूनही दक्षिण आफ्रिकेला पराभवाला सामोरे जावे लागले. यंदा तुम्ही चोकर्स नाहीत, विजयासाठी तुम्ही सर्वतोपरी प्रयत्न केलेत. तुमचा आम्हाला अभिमान वाटतो, अशा शब्दांत दक्षिण आफ्रिकेचे क्रीडामंत्री फिकीइल बालुला यांनी संघाचे कौतुक केले.
फुटबॉल विश्वचषकात पराभूत झालेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा बालुला यांनी शेलक्या शब्दांत निषेध केला होता. ‘‘हरणाऱ्या लोकांचा चमू आणि सुमार प्रदर्शन करणारे खेळाडू,’’ अशा शब्दांत त्यांनी पराभूत फुटबॉलपटूंची निर्भर्त्सना केली होती. मात्र क्रिकेटपटूंच्या बाबतीत बालुला यांची भूमिका वेगळी आहे.
‘‘न्यूझीलंडविरुद्ध शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही झुंज दिलीत. माझ्या दृष्टीने तुम्ही विजेतेच आहात आणि मला खात्री आहे की माझ्या मताशी अख्खा देश सहमत असेल,’’ असे त्यांनी सांगितले.  
उपांत्य फेरीच्या सामन्याचे वृत्तांकन करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेतील वृत्तपत्रांनी ‘चोकर्स’ शब्दाचा उल्लेख कटाक्षाने टाळला. पराभवानंतर डोळ्यांत अश्रू तरळलेल्या क्रिकेटपटूंची छायाचित्रे बहुतांशी वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केली आहेत.