भारताच्या फिरकी गोलंदाजांचे प्रचंड दडपण दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांवर आहे. त्यामुळेच चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताचे वर्चस्व दिसून येत आहे, असे मत भारताचा सलामीवीर फलंदाज मुरली विजयने व्यक्त केले.
‘‘प्रामाणिकपणे सांगायचे तर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांवर आम्ही जे दडपण दिले आहे, ते जवळून पाहणे म्हणजे अविश्वसनीय अनुभूती असते. हेच भारताच्या पथ्यावर पडते आहे,’’ असे विजयने सांगितले. जामठा येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर २५ नोव्हेंबरपासून तिसऱ्या कसोटी सामन्याला प्रारंभ होणार आहे.
‘‘आम्ही दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना अस्सल दडपण दिले आहे, परंतु तसे ते आमच्यावरही असते. आम्ही योजनाबद्ध फलंदाजी जेव्हा करतो, तेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचेही दडपण आम्हाला जाणवते. त्यामुळे ही मालिका अतिशय रंगतदार होत आहे,’’ असे विजयने सांगितले. मोहालीतील पहिली कसोटी जिंकून भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे. त्यानंतर बंगळुरूची दुसरी कसोटी पावसामुळे अनिर्णीत राहिली.
भारताच्या तिहेरी फिरकी माऱ्यासमोर मोहालीत दक्षिण आफ्रिकेचा संघ दोन्ही डावांत गडगडला. रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा आणि अमित मिश्रा यांच्यापुढे ए बी डी’व्हिलियर्स वगळता अन्य कोणत्याही फलंदाजाचा निभाव लागला नाही. बंगळुरूत मिश्राचा समावेश करण्यात आला नव्हता, परंतु तरीही दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. विजयने मोहालीत अनुक्रमे ७५ आणि ४७ धावा केल्या, तर बंगळुरूत तो २८ धावांवर नाबाद राहिला. विजयने २००८मध्ये नागपूरलाच ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. त्या सामन्यात विजयने वीरेंद्र सेहवागसोबत भारताच्या डावाला प्रारंभ केला होता. या मैदानाचे माझ्या आयुष्यात खास स्थान आहे, असे विजयने सांगितले.