दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू आणि मुंबई इंडियन्सचा फिल्डिंग कोच जाँटी ऱ्होडसला कालचा रविवार दुहेरी आनंद देणारा ठरला. मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या दहाव्या सत्राचे विजेतेपद मिळवण्यापूर्वीच जाँटीला एक आनंदाची बातमी समजली. मुंबईच्या विजेतेपदामुळे त्यात आणखी भर पडली. सामना सुरू होण्यापूर्वी दोन तास आधी म्हणजे सांयकाळी ६.०९ वाजता जाँटीच्या पत्नीने मुंबईत एका गोंडस मुलाला जन्म दिला. त्यानंतर अवघ्या १० मिनिटांत जाँटीने ट्विट करून याची माहिती दिली. ‘नॅथन जॉनने या जगात उडी मारली,’ अशा शब्दांत त्याने ट्विट केले. जाँटीच्या पत्नीची प्रसुती मुंबईतील सांताक्रूज येथील सुर्या हॉस्पिटलमध्ये झाली. या वेळी जाँटी आयपीएलच्या अंतिम सामन्यासाठी हैदराबादेत होता.

विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वीही ऱ्होडस दाम्पत्याला आयपीएल सामन्यादरम्यानच कन्यारत्न प्राप्त झाले होते. जाँटीने आपले भारतप्रेम दाखवताना मुलीचे नाव ‘इंडिया’ असे ठेवले होते.

‘जाँटीने मला पत्र लिहिले होते. त्यात त्याने आपल्या दुसऱ्या अपत्यासाठीही ‘वॉटर बर्थ’ पद्धतीची प्रसुती करायची असल्याचे म्हटले होते. मला वाटतं कदाचित दक्षिण आफ्रिकेत ही पद्धत सहजासहजी उपलब्ध होत नसावी,’ असे मत सुर्या हॉस्पिटलचे स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. अमित धुरंधर यांनी सांगितले. याच पद्धतीने ‘इंडिया’चा एप्रिल २०१५ मध्ये जन्म झाला होता. जाँटीची पत्नी साधारणपणे ४ च्या सुमारास हॉस्पिटलमध्ये आली. तिने ६.०९ वाजता वॉटर बर्थ पद्धतीने मुलाला जन्म दिला. मुलाचे वजन ३.७ किलोग्रॅम असल्याचे, डॉक्टरांनी सांगितले.

दरम्यान, जाँटीने दि. २३ एप्रिल रोजी ट्विट करून आपल्या मुलीच्या वाढदिवसाची घोषणा केली होती. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याला उत्तर देताना ‘हॅप्पी बर्थडे टू इंडिया फ्रॉम इंडिया,’ अशा अनोख्या पद्धती शुभेच्छा दिल्या होत्या.