पूर्वाचल राज्यांमधील पारंपरिक लोकरचना व संस्कृतीचे प्रत्यय घडविणाऱ्या विलोभनीय सोहळ्याद्वारे दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेस येथे प्रारंभ झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन झाले.
गांधी अ‍ॅथलेटिक्स स्टेडियमवर आयोजित केलेल्या या सोहळ्यात येथील कलाकारांनी विविध पारंपरिक नृत्ये सादर करीत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. स्पर्धेसाठी सहभागी देशांमधील मुख्य नद्यांचे पाणी आणण्यात आले होते. प्रत्येक देशाच्या पथकापुढे एक लहान मुलगा व मुलगी यांनी एका कलशात हे पाणी घेत संचलनात भाग घेतला. भारतीय पथकाचे ध्वज नेण्याचा मान स्क्वॉशपटू सौरव घोशाल याला मिळाला. प्रेक्षकांनी त्याचे टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले. खेळाडूंच्या वतीने घोशाल याने शपथ घेतली तर क्रीडा ज्योत प्रज्वलित करण्याचा मान फुटबॉलपटू बायचुंग भूतिया याला मिळाला. गगन नारंग, मोनालिसा बरुआ-मेहता, भोगेश्वर बरुआ, राणी रामपाल, कृष्णन पूनिया व अंजु बॉबी जॉर्ज यांनी स्टेडियमवर ही ज्योत आणली.
मोदी यांनी स्पर्धेचे उद्घाटन केल्याचे जाहीर करताना सांगितले, ही स्पर्धा म्हणजे पूर्वाचल प्रदेशांमधील विकासाकरिता असलेली सुवर्णसंधी आहे. या भागात विपुल प्रमाणात क्रीडा नैपुण्य आहे. संघटकांनी त्यांच्या विकासावर लक्ष केंद्रित करावे.
समारंभाची सांगता फटाक्यांच्या आतषबाजीने झाली.