भारताला फेडरेशन टेनिस स्पर्धेत रविवारी दक्षिण कोरियाविरुद्ध ०-३ असे दारुण पराभवास सामोरे जावे लागले. त्यामुळे आशिया/ओशेनिया गटात त्यांची पुन्हा दुसऱ्या श्रेणीत घसरण झाली आहे. गतवर्षी भारतास प्रथम श्रेणीत बढती मिळाली होती.
एकेरीच्या पहिल्या लढतीत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ऋतुजा भोसले या पुण्याच्या खेळाडूने सो राई ली हिला चिवट झुंज दिली, मात्र हा सामना कोरियन खेळाडूने ७-६ (७-५), ६-१ असा जिंकला. पाठोपाठ भारताच्या कायरा श्रॉफ हिला हान सुंग हेई हिच्याकडून ४-६, ३-६ असा पराभव पत्करावा लागला.
या स्पर्धेतील साखळी गटात भारताने कझाकिस्तान व थायलंड या दोन्ही संघांविरुद्ध ०-३ असे सामने गमवावे लागले होते.