अ‍ॅटलेटिको बिलबाओविरुद्ध एका गोलाने पिछाडीवर पडल्यानंतर स्टार खेळाडू लिओनेल मेस्सी बार्सिलोनाच्या विजयासाठी धावून आला. मेस्सीने ७४व्या मिनिटाला झळकावलेल्या निर्णायक गोलमुळे बार्सिलोनाने अ‍ॅटलेटिको बिलबाओवर २-१ असा रोमहर्षक विजय संपादन केला. या विजयामुळे बार्सिलोनाने स्पॅनिश लीग फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद पटकावण्याच्या पुसटशा आशा जिवंत ठेवल्या आहेत.
आर्टिझ आदुरिझने दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच गोल करत अ‍ॅटलेटिको बिलबाओला आघाडीवर आणले होते. बार्सिलोना संघ सलग चौथ्या पराभवाच्या सावटाखाली होता. मात्र हार न मानण्याची वृत्ती दाखवत प्रेडो रॉड्रिगेझ आणि मेस्सी यांनी तीन मिनिटांच्या अंतराने दोन गोल करत बार्सिलोनाला तीन गुणांची कमाई करून दिली. या विजयामुळे बार्सिलोना संघ गुणतालिकेत ८१ गुणांसह दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. अ‍ॅटलेटिको माद्रिदने ८५ गुणांसह अव्वल स्थान कायम राखले आहे. उर्वरित चार सामन्यांपैकी पुढील दोन सामन्यात अ‍ॅटलेटिको माद्रिदला पराभवाला सामोरे जावे लागले तरच बार्सिलोनाला जेतेपद पटकावण्याची संधी मिळणार आहे.
पहिल्या सत्रात दोन्ही संघांना गोलशून्यची कोंडी फोडता आली नव्हती. अखेर ५०व्या मिनिटाला आदुरिझने सुरेख गोल करून अ‍ॅटलेटिको बिलबाओचे खाते खोलले. त्याआधी त्याने गोल करण्याच्या दोन संधी वाया घालवल्या होत्या. प्रचंड दडपणाखाली असताना प्रेडोने ७२व्या मिनिटाला बरोबरी साधून दिली. त्यानंतर दोन मिनिटांनी मेस्सीने गोल झळकावत बार्सिलोनाच्या विजयावर मोहोर उमटवली.