ऑस्ट्रेलियाच्या सॅम ग्रोथचा पराभव करून तिसऱ्या फेरीत प्रवेश ; अ‍ॅना इव्हानोव्हिकचा विजय
वेगवान सव्‍‌र्हिसची नोंद नावावर असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या सॅम ग्रोथचा तेजतर्रार मारा इंग्लंडच्या अँडी मरेसमोर निष्प्रभ ठरला. गुरुवारी ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पध्रेच्या दुसऱ्या फेरीत मरेने ९१ मिनिटांत ग्रोथवर ६-०, ६-४, ६-१ असा विजय मिळवला. महिला गटात अ‍ॅना इव्हानोव्हिकने सहज विजय मिळवत तिसरी फेरी गाठली.
बुसान येथे २०१२मध्ये पार पडलेल्या एटीपी चॅलेंजर स्पध्रेत २६३ किमी प्रति ताशी वेगाने सव्‍‌र्हिस करून सर्वात जलद सव्‍‌र्हिसचा विक्रम ग्रोथने नोंदवला होता. वेगवान सव्‍‌र्हिसवीर म्हणून चर्चेत असलेल्या ग्रोथचा मारा मरेसमोर मात्र निष्प्रभ ठरला. अप्रतिम बचाव आणि फटके मारण्याचे कौशल्य यामुळे मरे सरस ठरला. मरेने १० एसेस मारले, तर ७ वेळा ग्रोथची सव्‍‌र्हिस भेदण्यात त्याला यश आले.
मरे म्हणाला, ‘‘ही सर्वोत्तम खेळी होती, असे मी म्हणणार नाही, परंतु ही चांगली सुरुवात नक्की आहे. याहून अधिक चांगली कामगिरी करता येईल, असे मला वाटते.’’
पुरुष एकेरीच्या दुसऱ्या सामन्यात मिलोस राओनिकने दोन तास ५५ मिनिटे चाललेल्या सामन्यात टॉमी रॉब्रेडोवर ७-६ (८/६), ७-६ (७/५), ७-५ असा विजय मिळवला.
महिला एकेरीत सर्बियाच्या इव्हानोव्हिकने लॅटव्हियाच्या अ‍ॅनास्टासिजा सेव्हास्तोव्हावर ६-३, ६-३ असा विजय मिळवला. दोन वेळा ऑस्ट्रेलियन खुल्या स्पध्रेचे जेतेपद पटकावणाऱ्या व्हिक्टोरिया अझारेंकाने ६-१, ६-२ अशा फरकाने डँका कोव्हिनिकचा पराभव केला. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या गॅर्बिन मुगुरुझानेही ६-४, ६-२ अशा फरकाने क्रिस्टेना फ्लिप्केन्सवर मात केली. ‘‘क्रिस्टेना प्रतिस्पर्धी म्हणून आव्हानात्मक आहे आणि त्यामुळे या विजयाचा आनंद अधिक आहे,’’ अशी प्रतिक्रिया मुगुरुझाने दिली.
इंग्लंडच्या जोहान्ना कोंटाने चीनच्या झेंग साइसाइचा ६-२, ६-३ असा पराभव करून तिसरी फेरी गाठली. एखाद्या ग्रँड स्लॅम स्पध्रेच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश करण्याची तिची ही तिसरी वेळ आहे. पात्रता फेरीतून मुख्य फेरीत स्थान पटकावणाऱ्या जपानच्या १८ वर्षीय नाओमी ओसाकाने धक्कादायक निकालाचे सत्र कायम राखताना १८व्या मानांकित युक्रेनच्या एलिना स्विटोलीनावर ६-४, ६-४ असा विजय मिळवला.
सर्बियाच्या जेलेना जॅनकोव्हिकला पराभव पत्करावा लागला. जर्मनीच्या लौरा सिएगेमूंडने ३-६, ७-६ (७/५), ६-४ अशा फरकाने माजी अव्वल क्रमांकाच्या खेळाडूला पराभूत केले.