कुंभार जसा आपल्या हाताने मातीला हळुवार आकार देत नव्या कलाकृती घडवत जातो, तशाच प्रकारची कलाकृती रेड बुलने निर्माण केली ती सेबॅस्टियन वेटेलच्या रूपाने. भक्कम अर्थव्यवस्था, जगातील सर्वात वेगवान कार, सर्वोत्तम तंत्रज्ञ आणि योग्य रणनीती या जोरावर रेड बुलने वेटेल नावाच्या हिऱ्याला खऱ्या अर्थाने पैलू पाडले, पण अंगभूत कौशल्य आणि वेगालाही मागे टाकण्याच्या सामर्थ्यांच्या बळावर वेटेलरूपी हिरा फॉम्र्युला-वनमध्ये चमकत आहे. युवा वेटेलने मिळवलेले यश हे वादातीत आहे.
सायकल चालवतानाही पाय लटपटतात, अशा वयाच्या चौथ्या वर्षी वेटेलने मोटारस्पोर्ट्सचा श्रीगणेशा केला. खरे तर गायक किंवा हास्यकलाकार बनण्याची इच्छा असताना तो विलक्षण आकर्षण असलेल्या मोटारस्पोर्ट्सकडे वळला. गुरुस्थानी असलेल्या मायकेल शूमाकरकडूनच नंतर धडे गिरवल्यावर वेटेल व्यावसायिक शर्यतींकडे वळला. एकापाठोपाठ यशाची शिखरे पादाक्रांत करत असताना वेटेलने कधीच मागे वळून पाहिले नाही. जर्मन ज्युनियर कार्टिग अजिंक्यपद स्पर्धा, मोनॅको कोर्ट चषक, युरोपीयन ज्युनियर कार्टिग अजिंक्यपद शर्यत, फॉम्र्युला बीएमडब्ल्यू जर्मनी अजिंक्यपद स्पर्धा, फॉम्र्युला-३ युरोसीरिज अशा स्पर्धामध्ये आपल्या गुणवत्तेची छाप पाडल्यानंतर बीएमडब्ल्यूच्या मदतीमुळेच वेटेलचा फॉम्र्युला-वनमधील मार्ग सुकर झाला. विल्यम्सकडून नंतर टोरो रोस्सोकडे वळालेल्या वेटेलने आपल्या कामगिरीने सर्वानाच अचंबित केले. वेटेल हा ‘लंबी रेस का घोडा’ आहे, हे रेड बुलच्या लक्षात आल्यामुळेच त्यांनी टोरो रोस्सोसारख्या कमी बजेट असलेल्या संघाकडून वेटेलला वयाच्या १८व्या वर्षी आपल्या संघात समाविष्ट करून घेतले आणि जगाला खरा चॅम्पियन मिळाला.
फॉम्र्युला-वनमधील नवख्या रेड बुलला पहिली पोल पोझिशन आणि पहिले जेतेपद मिळवून दिले ते वेटेलनेच. वेटेल आणि मार्क वेबर या जोडीने रेड बुलला तीन वेळा कंस्ट्रक्टर्स (संघ) चॅम्पियनशिप आणि सर्व काही मिळवून दिले. २००९मध्ये ड्रायव्हर्स चॅम्पियनशिपमध्ये दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागलेल्या वेटेलने पुढील वर्षी आपला दबदबा निर्माण केला. अखेरच्या शर्यतीत वेटेलने विश्वविजेतेपदावर नाव कोरल्यामुळे जगाला सर्वात युवा चॅम्पियन मिळाला. २०११ हे वर्ष वेटेलच्या निर्विवाद वर्चस्वाची यशोगाथा म्हणावी लागेल. १९ पैकी ११ शर्यती जिंकणारा वेटेल चार शर्यती शिल्लक असतानाच सलग दुसऱ्यांदा विश्वविजेता ठरला होता, पण २०१२च्या मोसमात वेटेलच्या कौशल्याचा खरा कस लागला.
सलग दोन वर्षे फॉम्र्युला-वन शर्यतींवर हुकमत गाजवणारा वेटेल यंदाही अशीच करामत करून दाखवेल, अशी सर्वाना अपेक्षा होती, पण बाकीच्या संघांनीही वेटेलला शह देण्यासाठी रणनीती आखली. मोसमाच्या पहिल्या टप्प्यात वेटेलला एकच शर्यत जिंकता आली, त्यामुळे पहिल्या सात शर्यतींत सात निराळे विजेते पाहायला मिळाले. फेरारीचा फर्नाडो अलोन्सो याने मात्र आपल्या कामगिरीत सातत्य राखून विश्वविजेतेपद पटकावण्याच्या दिशेने कूच केली होती, पण दुसऱ्या टप्प्यात वेटेलने आपला सर्व अनुभव पणाला लावत चार शर्यती जिंकून अलोन्सोला गाठले. मोसमातील शेवटून दुसऱ्या अमेरिकन ग्रां. प्रि.दरम्यान वेटेलचे विश्वविजेतेपद निश्चित होणार होते, पण आयत्या वेळी लुइस हॅमिल्टनने ‘खो’ घातला आणि विश्वविजेतेपदाचा फैसला अखेरच्या ब्राझिलियन ग्रां. प्रि.वर येऊन पोहोचला. अग्रस्थानी असलेल्या वेटेल आणि अलोन्सो यांच्यात १३ गुणांचा फरक. म्हणजेच अलोन्सोने ही शर्यत जिंकली तरी वेटेलला पहिल्या पाच जणांत स्थान पटकावणे भाग होते. शर्यतीला सुरुवात झाली, अन् फासे उलटे पडत गेले. विश्वविजेतेपद डोळ्यासमोर दिसत असतानाही सर्व काही विपरीत घडत होते. पहिल्याच फेरीमध्ये वेटेलला चौथ्या वळणावर अपघात झाला, पण हार न मानता त्याने त्याच कारसह सहाव्या क्रमांकावर मजल मारली आणि तीन गुणांच्या फरकाने अलोन्सोकडून विश्वविजेतेपद हिरावून घेतले.
आतापर्यंत फॉम्र्युला-वनच्या इतिहासात तब्बल नऊ जणांनी सलग तीन वेळा विश्वविजेतेपद जिंकण्याची करामत करून दाखवली असली तरी वेटेलने मात्र सर्वात कमी वयात (२५व्या वर्षी) ते शिखर गाठले आहे. सहा वर्षांच्या कारकीर्दीत तब्बल तीन वेळा विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या या अवलियाने फॉम्र्युला-वनच्या इतिहासातील अव्वल ड्रायव्हर्सच्या यादीत वरचे स्थान पटकावले आहे, हे निश्चित!