क्रिकेटमध्ये आपले चटकन स्थान निर्माण करण्यासाठी आणि लोकांनी दखल घेण्यासाठी अनेक खेळाडू काहीतरी चमत्कार करण्याच्या मागे लागतात. ज्यालाच विविधता म्हणतात. आणि या विविधतेच्या भुलभुलैयात अडकून स्वत्व विसरतात आणि मग सुरु होतो अपयशाचा नैराश्येचा जीवघेणा मार्ग. डार्विनच्या उत्क्रांतिच्या सिद्धांताप्रमाणे विविधतेचे दोन प्रकार पडतात. ज्या प्राण्यात अशा विविधता निर्माण होतात आणि ज्यामुळे तो निसर्गात टिकून राहतो, त्या उपयोगी विविधता आणि ज्या विविधतांमुळे त्याचे अस्तित्व धोक्यात येते त्या घातक विविधता. त्यामुळे क्रिकेटमध्ये सुद्धा गोलंदाजाकडे नुसती विविधता आहे म्हणजे तो श्रेष्ठ असे म्हणणे चूक आहे. घातक विविधता बाळगली आणि त्याच्याच प्रेमात गोलंदाज पडला तर तो संपायला वेळ लागत नाही.
आपले आश्विन महाराज यश मिळवण्याच्या धुंदीत अशाच भरमसाठ विविधतांच्या मागे लागले होते. दर काही सामन्यानंतर अॅक्शनच बदल, विकेटजवळ आल्यावर क्षणभर थांबायचे आणि मग बॉल टाकायचा, दोन बोटांतून टिचकिने कॅरमच्या स्ट्रायकरप्रमाणे चेंडू टाकायचा (कॅरम बॉल), मनगट फिरवून लेग स्पिन टाकायचा. थोडक्यात ऑफस्पिन सोडून सर्व काही करायचं. शास्त्रीय संगीतात जसा मिश्र राग असतो तसा. पण तो निदान गोड तरी वाटतो. हे मिश्र गोलंदाज भाराभर चिंध्या करतात.
सद्यपरिस्थितीत क्रिकेट जगतात उत्तम स्विंग गोलंदाजा इतकीच कोणाची दहशत असेल, तर चांगल्या ऑफस्पिनरची. ट्वेंटी-२० मुळे फलंदाचाचे तंत्र, संयम वगैरेची पूर्ण वाट लागलेली असताना एक अचूक ऑफस्पिनर जो सहा चेंडू एकाच टप्प्यावर ऑफ स्टंपच्या थोड़ा बाहेर फ्लाइट मधल्या विविधतेने टाकतो. तो रोज ४ ते ५ विकेटचे बक्षीस घेऊन जातो. ग्रॅम स्वान, नेथन लायन आणि आता मोईन अली हेच करतायत आणि दहशत निर्माण करतायत. आश्विनने शास्त्रज्ञाचे प्रयोग थांबवले आणि त्याच्यातला ऑफस्पिनर खडबडून जागा झाला. त्याकरता त्याने किमान दोन वर्षे वाया घालवली. क्रिकेट हा किती मानसशास्त्राशी संलग्न विषय आहे हे लक्षात येते. एकच गोष्ट सातत्याने अविरत करत राहिली ज्याला व्यवस्थापन शास्त्रात पॉवर ऑफ रूटीन म्हणतात तर यश मिळतेच. विविधता ही बदल म्हणून असावी. विविधतेचेच रूटीन झाले तर त्याचा आश्विन होतो या धड्याची आश्विन प्रकारणातून पुन्हा उजळणी झाली.
– रवि पत्की
sachoten@hotmail.com