साधारणपणे एप्रिल महिना उजाडला, की महाराष्ट्रात ठिकठिकाणच्या शहरांमधील जलतरण तलाव, क्रिकेट व अन्य खेळांची मैदाने ओसंडून वाहत असतात. मुला-मुलींची ही गर्दी पाहून क्रीडा क्षेत्राला सुगीचे दिवस आले आहेत असेच वाटत असते. मात्र बऱ्याच वेळा ही शिबिरे म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टीत मनोरंजनाद्वारे काही अल्प शिक्षण घेण्याची तात्पुरतीच संधीच असते.
k06मुंबईत श्रीसमर्थ व्यायाम मंदिर, पुण्यात महाराष्ट्रीय मंडळ, सन्मित्र संघ यांच्यासह अनेक संस्था गेली अनेक वर्षे वासंतिक सुट्टीत अ‍ॅथलेटिक्स, पोहणे, पारंपरिक व्यायाम, बॅडमिंटन, खो-खो, सूर्यनमस्कार, व्हॉलिबॉल, डॉजबॉल आदी अनेक खेळांचे प्रशिक्षण वर्ग घेत आहेत. श्रीसमर्थ व्यायाम मंदिरातर्फे घेतल्या जाणाऱ्या शिबिरात ५ ते ८५ वर्षे वयोगटातील सर्वानाच साधनविरहित व्यायामाचा आनंद घेण्याची संधी दिली जात आहे. महाराष्ट्राबाहेरील राज्यांमधूनही अनेक जण या शिबिरात भाग घेतात. यंदा काही अंध मुलींनीही त्यामध्ये भाग घेतला आहे. महाराष्ट्रीय मंडळातर्फे विविध शाळांमध्ये शिक्षक म्हणून काम करणाऱ्यांसाठी शारीरिक शिक्षणाचे प्रमाणपत्र शिबीरही घेतले जात असते. त्याला परराज्यांमधूनही भरघोस प्रतिसाद मिळत असतो. राज्यांतील सर्वच शहरांमध्ये जलतरण शिबिरास सर्वात जास्त प्रतिसाद मिळतो. आपल्या पाल्याची पाण्याची भीती घालविण्याच्या हेतूने अनेक पालक आपल्या मुला-मुलींना या शिबिरात अडकवितात. साधारणपणे एक महिनाभर चालणाऱ्या या शिबिराच्या शेवटी तो विद्यार्थी पोहण्याचे ज्ञान आत्मसात करतो, हीच या शिबिराची कामगिरी असते.  जिम्नॅस्टिक्स, मल्लखांब, तिरंदाजी, नेमबाजी, अश्वारोहण आदी खेळांनाही भरघोस प्रतिसाद मिळू लागला आहे.  
संकलन : मिलिंद ढमढेरे
 
समर्थ भारत, सशक्त भारत’ हे तत्त्व डोळ्यांसमोर ठेवतच आम्ही गेली ४१ वर्षे श्री समर्थ व्यायाम मंदिरातर्फे वासंतिक शिबीर आयोजित करीत आहोत. कुटुंबातील सर्वानाच एकाच वेळी त्याचा आनंद घेता येईल, या दृष्टीने आम्ही ५ ते ८५ वर्षे वयोगटासाठी हे शिबीर घेत असतो. सूर्यनमस्कार, योगासन आदी पारंपरिक व साधनविरहित व्यायामाद्वारे त्यांना मार्गदर्शन देतो. साधारणपणे दरवर्षी दोन हजार लोक सहभागी होतात. या सर्वाची शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती, लवचीकता, शारीरिक क्षमता आदी चाचणी आम्ही घेतो आणि त्यानुसार त्यांना सल्ला दिला जातो. आरोग्याबाबत सजग करण्याचेच आमचे ध्येय असते.   
– उदय देशपांडे, श्री समर्थ व्यायाम मंदिर

उन्हाळ्याच्या सुट्टीत पोहणे शिबिरास दरवर्षी उच्चांकी प्रतिसाद मिळत असतो. आपल्या पाल्यास पाण्यात पडल्यानंतर हातपाय मारता यावेत हाच बहुसंख्य पालकांचा उद्देश असतो. या विद्यार्थ्यांमधून जलतरणासाठी नैपुण्य मिळावे यासाठी पुण्यात आम्ही शिबिराच्या शेवटी प्रत्येक तलावावर शिकणाऱ्या मुलामुलींसाठी स्पर्धा आयोजित करीत असतो. त्याच्या आधारे कोणत्या मुला-मुलींमध्ये स्पर्धात्मक जलतरण कारकीर्द करण्यासाठी योग्य नैपुण्य आहे याची माहिती आम्ही पालकांना देत असतो. साधारणपणे एक हजार मुला-मुलींमधून दहा-बारा विद्यार्थी पुढे स्पर्धात्मक कारकीर्द करण्यासाठी योग्य असतात. अशा मुलांना प्रशिक्षण देण्यास आम्ही सर्व शिक्षक सदैव तयार असतो.
– मनोज एरंडे, आंतरराष्ट्रीय जलतरणपटू  

शिबिरांबाबत ही काळजी घ्या..
*जलतरण शिबिरासाठी पाल्याला घालताना तलावावर सुरक्षा व्यवस्था, प्रशिक्षकाकडे एका वेळी किती विद्यार्थी आहेत हे पाहणे.
*अनेक वेळा पालकांना आपल्या पाल्यास कोणताही खेळ अवघ्या ७-८ दिवसांत शिकता यायला पाहिजे, अशी अपेक्षा असते. हातात टेनिसची रॅकेट घेतल्यानंतर त्याने आठ दिवसांत रॅफेल नदालसारखे यश मिळविले पाहिजे अशी अपेक्षा करू नये.
*प्रशिक्षणाच्या ठिकाणी जी काही नियमावली दिली आहे, त्याचे पालन होत आहे ना याची काळजी घेणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, जलतरण शिबिराच्या वेळी पोशाखाबाबत पालन केलेच पाहिजे. आपल्या पाल्याबाबत विनाकारण अतिउत्साह दाखवू नये.
*पालकांनी प्रशिक्षकांच्या कामात ढवळाढवळ करू नये. प्रशिक्षकांबाबत काही शंका असेल तर अगोदर संयोजकांना सांगावी.
*जलतरण, अ‍ॅथलेटिक्स, बॉक्सिंग, तिरंदाजी, नेमबाजी आदी खेळांच्या सुविधा चांगल्या आहेत ना, याची खात्री करावी.
*प्रशिक्षकाकडे खूप गर्दी असेल व वैयक्तिक लक्ष दिले जात नसेल, तर त्याबाबत संयोजकांकडे वेळीच तक्रार करणे आवश्यक आहे.