आपण घरबसल्या आरामात क्रीडा वाहिन्यांवर वेगवेगळे खेळांचे अटीतटीचे सामने बघत असलो, तरी या वाहिन्यांची आपसात सुरू आहे ती तीव्र सत्तास्पर्धा. आज जवळपास ३० वाहिन्या हा पैशांचा खेळ खेळत आहेत.

‘कपिलाषष्ठी’चा तो ऐतिहासिक योग भारतात पाहण्याचे भाग्य कोणत्याही भारतीयाला तेव्हा लाभले नव्हते. तत्कालीन भारतीय क्रिकेटप्रेमींनी पाहिली ती फक्त क्षणचित्रे. १९८३च्या विश्वचषकातील तो संस्मरणीय सामना, तसा झिम्बाब्वेसारख्या दुबळय़ा संघाविरुद्धचा. परंतु ४ बाद ९ अशी भारताची सुरुवातीला केविलवाणी अवस्था झाली. दहा मिनिटांतच निम्मा संघ १७ धावांत तंबूत परतल्यानंतर धावफलकावर अर्धशतक झळकण्याची शक्यताही अवघड दिसत होती. पण कपिल देवने चमत्कार घडवला. रॉजर बिन्नी, मदन लाल आणि सय्यद किरमाणी यांना साथीला घेत त्याने भारताला ५० षटकांत ८ बाद २६६ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. यात एकटय़ा कपिलचे योगदान होते १७५ धावांचे. १६ चौकार आणि ६ षटकारांसह त्याने ती वादळी खेळी साकारली होती. त्यानंतर सुदैवाने भारतीय क्रीडारसिकांना उपांत्य आणि अंतिम फेरीच्या सामन्याचे थेट प्रक्षेपण असंख्य ‘व्यत्यय’विरामांसह पाहता आले. भारताने २५ जून १९८३ या दिवशी लॉर्ड्सवर विश्वचषक उंचावला आणि येथूनच क्रीडा प्रक्षेपणाचे माहात्म्य अन् त्याचे अर्थकारण भारताला कळू लागले.

१९७६ मध्ये दूरदर्शन आकाशवाणीपासून स्वतंत्र झाले. त्यानंतर १९८२ हे वर्ष हे भारतीय टीव्ही प्रक्षेपणाला कलाटणी देणारे ठरले. याच वर्षी राष्ट्रीय प्रक्षेपणाला प्रारंभ झाला आणि भारतीय बाजारपेठेत रंगीत टीव्हीचा प्रवेश झाला. फेब्रुवारी-मार्चमध्ये कोलकाता येथील इडन गार्डन्सवर झालेल्या पहिल्या नेहरू चषक फुटबॉल स्पध्रेचे पाच कॅमेऱ्यांच्या साहाय्याने रंगीत प्रक्षेपण करण्यात आले होते. मग दिल्लीत नोव्हेंबरमध्ये झालेल्या महत्त्वाकांक्षी आशियाई क्रीडा स्पध्रेचाही भारतायांनी ‘याचि देही, याचि डोळा’ आनंद लुटला. त्या घटनेला आता ३५ वष्रे झाली. दरम्यानच्या काळात क्रीडा वाहिन्यांचे महायुद्ध आता तेजीत आले आहे. आता देशभरात एकंदर वाहिन्यांचे पीक मोठय़ा प्रमाणात आले आहे, त्यापैकी जवळपास ३० वाहिन्या या क्रीडा वाहिन्या आहेत.

क्रिकेट म्हणजे भारतातील धर्म. या धर्मावर पकड घट्ट केली आहे ती स्टार स्पोर्ट्सने. त्यांनी यापुढे एक पाऊल पुढे टाकत काही राज्यांमध्ये प्रादेशिक वाहिन्याही काढण्यास प्रारंभ केला आहे. याचप्रमाणे गेल्या चार वर्षांत देशात रुजलेल्या प्रो कबड्डीचे केवळ प्रक्षेपणाचेच नव्हे, तर संपूर्ण हक्क स्टार स्पोर्ट्सकडे आहेत. सध्या त्यांना कडवे आव्हान दिले जात आहे ते सोनीकडून. बऱ्याच वर्षांपूर्वी विश्वचषक क्रिकेट स्पध्रेच्या प्रक्षेपणाने सोनीने देशाला मोहिनी घातली. २००३ आणि २००७ च्या विश्वचषकात मंदिरा बेदीच्या आकर्षक ‘एक्स्ट्रा इनिंग’ने क्रीडारसिकांची मने जिंकली होती. आता टेन स्पोर्ट्स सोनीसोबत आला आहे. त्यामुळे हे महायुद्ध कधी नव्हे, एवढे ऐन रंगात आले आहे.

क्रीडा वाहिन्यांच्या भारतीय प्रेक्षकसंख्येची आकडेवारी पाहिल्यास २०१६ मध्ये स्टार स्पोर्ट्स वाहिनी ४७ टक्के चाहते पाहात होते, तर सोनीच्या क्रीडावाहिन्यांकडे ४४ टक्के कल होता. याचप्रमाणे टेनकडेही ९ टक्के होते. मात्र यंदाच्या वर्षी पहिल्या सहामाहीचा अभ्यास केल्यास स्टार स्पोर्ट्सला ३५ टक्के आणि सोनीला ५५ टक्के (टेनच्या १२ टक्क्यांसह) प्रेक्षकसंख्येने कौल दिला आहे. आता चालू वर्षांचे उर्वरित सहा महिने हे क्रीडा क्षेत्रासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. स्टार स्पोर्ट्सने प्रो कबड्डी लीगच्या पाचव्या हंगामाला व्यापक स्वरूप दिले आहे. २८ जुलैपासून सुरू होणाऱ्या यंदाच्या प्रो कबड्डीमध्ये १२ संघांचा समावेश असून, पुढील १३ आठवडे १३०हून अधिक सामने भारतीय क्रीडारसिकांना पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे पुढील तीन महिने कबड्डीमय करण्याचीच योजना स्टार स्पोर्ट्सने आखली आहे. याशिवाय अल्टिमेट टेबल टेनिस लीगसह देशातील असंख्य लीगच्या प्रक्षेपणाचे हक्क हे स्टार स्पोर्ट्सकडे आहेत.

सोनीने जनमानसावर पकड निर्माण केली ती इंडियन प्रीमियर लीग ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेच्या प्रक्षेपणातून. प्रक्षेपणाची बदललेली समीकरणे त्यांनी देशात रुजवली. या महत्त्वाच्या स्पध्रेचे प्रक्षेपण सोनीकडे आहे, हेच स्टार इंडियाला अतिशय खुपते आहे. आता यंदाच्या उर्वरित वर्षांचा वेध घेतल्यास फिफा म्हणजेच आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाच्या महत्त्वाच्या स्पध्रेचे यजमानपद भारताकडे आहे. ऑक्टोबरमध्ये होणारी १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धा आपल्या देशात होणार आहे. या स्पध्रेच्या निमित्ताने देशात वातावरणनिर्मितीसाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. नुकतेच सोनी-टेन क्रीडा वाहिन्यांनी आपल्या एकंदर ११ क्रीडा वाहिन्यांची महाशक्ती दाखवताना महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची सदिच्छादूत म्हणून नियुक्ती केली आहे. इतकेच कशाला २६ जुलैपासून सुरू होणाऱ्या भारत-श्रीलंका यांच्यातील क्रिकेटद्वंद्वाचे प्रक्षेपणही सोनीवर दिसणार आहे.

भारतात सध्या प्रामुख्याने स्टार इंडिया आणि सोनी यांच्यातच सत्तास्पर्धा आहे. बाकी कोणत्याही क्रीडावाहिन्या खिजगणतीतही नाहीत. २००७ मध्ये भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषकात सपाटून मार खाल्ल्यावर झी समूहाच्या सुभाष चंद्रा यांनी झी स्पोर्ट्स वाहिनी रुजवण्याच्या हेतूने इंडियन क्रिकेट लीग (आयसीएल) सुरू केली. पण जागतिक कीर्तीचे खेळाडू फोडण्यात त्यांना फारसे यश आले नाही. परिणामी आयसीएलला दोन वर्षांतच आपला गाशा गुंडाळावा लागला.

डीडी स्पोर्ट्स म्हणजेच घरोघरी मोफत दिसली जाणारी सरकारी क्रीडा वाहिनी. अर्थकारणाच्या या स्पध्रेत प्रसार भारती विधेयकामुळे त्यांना भारतातील महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धाच्या प्रक्षेपणाचे अधिकार मिळाले. परंतु समालोचन आणि अन्य बाबतीत फारसा प्रभाव दाखवू न शकल्यामुळे त्यांचे अस्तित्व कधीच दिसले नाही.

क्रीडा वाहिन्यांची ही क्रांती काही एका रात्रीत घडलेली नाही. १९७०च्या दशकात एका टीव्ही चॅनेलचा मालक कॅरी पॅकरने रंगीबेरंगी कपडय़ांत प्रकाशझोतात क्रिकेट सामन्यांची टूम काढली होती. त्याच्या सामन्यांची ‘कॅरी पॅकर सर्कस’ म्हणून त्या वेळी थट्टा उडवण्यात आली होती. परंतु त्याचेच अर्थकारण नंतर क्रिकेटजगताला स्वीकारावे लागले. क्रिकेट सामने पाहण्यातून आणि खेळाच्या विपणनातून खूप पैसा मिळू शकतो, हे गणित पॅकरला ठाऊक होते.

१९८३ मध्ये भारताने अनपेक्षितरीत्या क्रिकेट विश्वचषक जिंकला. एकीकडे हॉकीमध्ये भारताची कामगिरी घसरत असताना क्रिकेटने देशाला नवी ओळख मिळवून दिली. सुनील गावस्कर, कपिल देव यांनी देशाला क्रिकेटचे वेड लावले. या निमित्ताने नवे नायक देशाला मिळाले. त्या वेळी काँग्रेसचे नेते एन. के. पी. साळवे हे बीसीसीआयचे अध्यक्ष होते. जादा तिकिटांची त्यांनी केलेली मागणी यजमान इंग्लंडने फेटाळून लावल्यामुळे संतप्त झालेल्या साळवे यांनी मग प्रयत्नपूर्वक १९८७ च्या विश्वचषकाचे यजमानपद भारताला मिळवून दिले. अंबानींच्या उद्योगसमूहाशी आर्थिक समझोता करून रिलायन्स विश्वचषक भारत-पाकिस्तानमध्ये यशस्वीपणे पार पडला. मग १९८९ पासून सचिन तेंडुलकर नामक सुवर्णस्वप्न देश जगला. तो क्रिकेटच्या दुनियेचा अनभिषिक्त सम्राट झाला. १९९३ मध्ये इंग्लिश संघ भारतीय दौऱ्यावर येणार होता आणि प्रक्षेपणाच्या हक्कांबाबत बरीच खलबते सुरू होती. त्या वेळी काँग्रेसचे माधवराव सिंदीया बीसीसीआयचे अध्यक्ष होते. क्रिकेटच्या प्रक्षेपणाचा नवा वाद हा या कालखंडात सुरू होता. अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे दूरदर्शनची एकाधिकारशाही मोडीत निघाली.

१९९६ मध्ये आयसीसीने अध्यक्ष पदासंदर्भात नवी नियमावली केली आणि बीसीसीआयचे अध्यक्ष जगमोहन दालमिया यांच्याकडे आयसीसीच्या अध्यक्षपदाची सूत्रे देण्यात आली. दालमिया अध्यक्ष झाले तेव्हा आयसीसीच्या खात्यावर १६ हजार डॉलर्स रक्कम जमा होती आणि तीन वर्षांनी त्यांनी पद सोडले तेव्हा एक कोटी ५० लाख अमेरिकन डॉलर्स इतकी माया त्यांनी आयसीसीला विविध माध्यमांतून जमा करून दिली होती. जाहिराती, टीव्ही प्रक्षेपण, प्रायोजकत्व, आदी माध्यमांतून फायद्याची गणिते मग रूढ होऊ लागली. राजकीय कारणांमुळे भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यांच्या आयोजनाला बंधने येत असताना दुबईतील सामन्यांचे आणखी एक पर्व सुरू झाले. परंतु कालांतराने संशयास्पद क्रिकेटचे आरोप होऊ लागल्यामुळे भारताने दुबईला संघ पाठवणे बंद केले.

क्रिकेटच्या व्यावसायीकरणात भारत आणि पाकिस्तान यांच्या सहभागावरसुद्धा अनेक आर्थिक गणिते अवलंबून असतात, हे सिद्ध झाले. टीव्ही पाहणाऱ्या प्रेक्षकांप्रमाणेच माहिती-तंत्रज्ञानाने मागील दशकात मोठी क्रांती केली. २००७च्या विश्वचषकात भारत व पाकिस्तान ही बलाढय़ राष्ट्रे साखळीत गारद झाली आणि व्यावसायिक कंपन्यांना मोठा तोटा सहन करावा लागला. त्यामुळे विश्वचषकाच्या कार्यक्रमात आमूलाग्र बदल करण्यात आला. याचप्रमाणे व्यावसायिक करारांमध्येही बदल झाले. मग ललित मोदीच्या सुपीक मेंदूतून साकारलेली इंडियन प्रीमियर लीग अस्तित्वात आली. या लीगला आधी दालमिया यांनी विरोध केला होता. परंतु आयपीएलने भारतीय क्रिकेटचे अर्थकारण कमालीचे पालटून टाकले. राजकीय मंडळी आणि उद्योगपतींनी गुंतवलेल्या पैशांवर घसघशीत फायदा मिळू लागला, खेळाडूंवर मोठमोठय़ा बोली लागल्या. २०१०मध्ये केंद्रीय मंत्री शशी थरूर आणि ललित मोदी यांच्यातील ‘ट्विटर’नाटय़ापर्यंत याकडे कुणाचेही लक्ष वेधले गेले नव्हते. परंतु क्रिकेटच्याच अर्थकारणाने या दोघांचा घात केला.

मग २०१३ मध्ये सचिन तेंडुलकरच्या कारकीर्दीतील २०० आणि अखेरच्या सामन्याचा मान खरे तर दक्षिण आफ्रिकेला जात होता. परंतु ते बीसीसीआयच्या धुरीणांना नामंजूर होते. हा सामना दक्षिण आफ्रिकेत गेला, तर प्रक्षेपणाचे अधिकार टेन क्रिकेट वाहिनीकडे जातील आणि अन्य माध्यमांतून मिळणाऱ्या पैशांवरही त्यांचा दावा असेल. त्यामुळे हा ऐतिहासिक सामना अर्थकारण आणि स्टार स्पोर्ट्स यांच्यासाठी भारतात आणण्यात आला. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेची योजना आखण्यात आली. सचिनच्या निरोपाचा भावनिक कार्यक्रमही मग प्रक्षेपणासाठी एक महानाटय़ ठरला. सचिनची अखेरची कसोटी वानखेडे स्टेडियमवर फार तग धरू शकली नाही. पण स्टार स्पोर्ट्सने सामना संपल्यावर सचिनचा हृदयस्पर्शी निरोप समारंभ साजरा केला. सचिनने त्याच्यावर निस्सीम प्रेम करणाऱ्या चाहत्यांचे आणि त्याच्या कारकीर्दीला योगदान देणाऱ्या अनेकांचे मनापासून धन्यवाद मानले. जवळपास २० मिनिटांच्या त्या भाषणाने देशभरातील, नव्हे जगभरातील क्रिकेटरसिकांच्या डोळय़ांमध्ये पाणी आणले. प्रेक्षकसंख्येच्या आकडेवारीत सचिनच्या या निरोपाच्या भाषणाने अनेक विक्रम मोडीत काढले.

सचिनच्या निवृत्तीनंतर क्रीडावाहिन्यांचा नवे तारे शोधण्याचा उद्योग आणखी वेगाने सुरू झाला. क्रिकेटव्यतिरिक्त अन्य खेळांनाही चांगले दिवस येऊ लागले. २०१६ मध्ये झालेल्या रिओ ऑलिम्पिकच्या निमित्ताने पी. व्ही. सिंधू, साक्षी मलिक यांचा पराक्रम पाहिला गेला. आगरतलासारख्या छोटय़ाशा गावातील जिम्नॅस्टिकपटू दीपा कर्माकरचा ऐतिहासिक प्रोडय़ुनोव्हा क्रीडा क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरला. भारतीय वेळेनुसार मध्यरात्री तिच्या स्पर्धाची वेळ होती, परंतु तरीही तिचा प्रयत्न उत्कंठेने टीव्हीवर पाहिला गेला. पूर्वी फक्त इंग्रजीत केले जाणारे समालोचन कालांतराने हिंदीतसुद्धा व्हायचे. आता स्टार स्पोर्ट्स आणि सोनी वाहिन्यांनी तर खास हिंदीतील वाहिन्यांचे जाळेसुद्धा विणले आहे. त्यामुळे देशी रसिकांना त्याचे धावफलक आणि गुणफलक हिंदीतून उपलब्ध होतात.

तूर्तास, स्टार स्पोर्ट्सच्या वर्चस्वाला आव्हान देत आता सोनीने पाकिस्तान, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज या देशांमधील प्रक्षेपण हक्क मिळवले आहेत. पुढील वर्षी आशियाई क्रीडा स्पर्धा आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा होणार आहेत. या दोन्ही स्पर्धा सोनीच्या माध्यमातूनच भारतात दिसणार आहेत. इतकेच कशाला पुढील वर्षी रशियात होणाऱ्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पध्रेचेही प्रक्षेपण सोनीच करणार आहे. त्यामुळे ही सत्तास्पर्धा अधिक तीव्र होतानाच भविष्यात दिसणार आहे. २८ ऑक्टोबर हा दिवस तसे पाहिल्यास भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. कारण या दिवशी एकीकडे फिफा विश्वचषकाचा १७ वर्षांखालील वयोगटाचा विजेता ठरणार आहे, दुसरीकडे प्रो कबड्डी लीगचा विजेता ठरणार आहे. या दोन्ही स्पर्धाच्या अंतिम फेऱ्या एकाच वेळेला म्हणजे ‘प्राइम टाइम’ला असणार आहे.
प्रशांत केणी – response.lokprabha@expressindia.com
सौजन्य – लोकप्रभा