‘प्रतिभा जोपासण्यासाठी पायाभूत सुविधा असणे आवश्यक आहे. देशात क्रीडा संस्कृती रुजवली तरच ऑलिम्पिक पदकांमध्ये वाढ होऊ शकेल’, असे मत भारताचे राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक आणि माजी खेळाडू पुल्लेला गोपीचंद यांनी व्यक्त केले. चार वर्षांपूर्वी लंडन ऑलिम्पिकमध्ये सायना नेहवाल तर रिओ ऑलिम्पिकमध्ये पी.व्ही. सिंधू या पदकविजेत्या खेळाडूंना गोपीचंद यांनीच मार्गदर्शन केले होते.

ते पुढे म्हणाले, ‘मी खेळत असतानाच्या काळापासून आता बराच बदल झाला आहे. अव्वल खेळाडूंना सरकारकडून निधी उपलब्ध होतो. मात्र पायाभूत पातळीसाठी निधीची तरतूद नसते. शालेय क्रीडा स्पर्धा महत्त्वाच्या आहेत. वेगवेगळे खेळ खेळणाऱ्या असंख्य खेळाडूंचा ताफा आपल्याकडे असायला हवा. त्याशिवाय पदकाचा विचार होऊ शकत नाही. आपली लोकसंख्या जास्त आहे. त्यामुळे क्रीडा संस्कृती निर्माण होणे कठीण आहे. असंख्य मुले शिक्षण सोडतात आणि त्यांचे खेळणेही बंद होते’.

‘ऑलिम्पिक स्पर्धेत आम्ही दूर राहत होतो. शांतपणे आम्ही डावपेच आखू शकत होतो. गेले तीन महिने केलेल्या अथक सरावाची परिणिती सिंधूच्या खेळात पाहायला मिळाली. २००० सिडनी ऑलिम्पिक स्पर्धेत मी पदकाच्या समीप आलो होतो. पण पदक पटकावू शकलो नाही. सिंधूच्या बाबतीत मला ते घडू द्यायचे नव्हते. त्यामुळे कांस्यपदकाच्या लढतीपेक्षा उपांत्य फेरीतून अंतिम फेरीत जाण्याला प्राधान्य दिले’, असे गोपीचंद यांनी स्पष्ट केले.