लिएण्डर पेसचा खेळाडूंना सल्ला
डेव्हिस चषक टेनिस स्पर्धा
‘‘खेळाडूंनी आपल्या मागण्यांसाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करणे गैर नाही. मात्र त्याकरिता खेळाचे नुकसान होणे चुकीचे असून सर्वापेक्षा खेळ अधिक महत्त्वाचा आहे,’’ असे भारताचा अनुभवी डेव्हिसपटू लिएण्डर पेस याने सांगितले.
भारत व दक्षिण कोरिया यांच्यात शुक्रवारपासून डेव्हिस चषक सामना सुरू होत आहे. भारताच्या सोमदेव देववर्मन याच्यासह अव्वल अकरा खेळाडूंनी या लढतीवर बहिष्कार घातल्यामुळे अखिल भारतीय टेनिस महासंघाने पेसला नवोदित खेळाडूंच्या साथीने या लढतीसाठी पाचारण केले आहे. पेस याने आतापर्यंत डेव्हिस चषकाच्या ४८ लढतींमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
आगामी लढतीपूर्वी पत्रकारांशी संवाद साधताना पेस म्हणाला, ‘‘खेळाडूंनी बंड केले आहे असे मी म्हणणार नाही. मात्र खेळाडूंकरिता चर्चेची दारे खुली असतात. खेळाडूंच्या मागण्यांपेक्षा खेळाला मी जास्त महत्त्व देईन. खेळाडूंची संघटना असेल किंवा खेळाची संघटना असेल, सर्वात शेवटी देशासाठी खेळणे ही सर्वात प्राधान्याची गोष्ट आहे. जीवनात आपल्याला घडीघडीला संघर्ष करावा लागतो. त्याप्रमाणेच खेळातही संघर्ष करावाच लागतो. काही वेळा मैदानावर तर काही वेळा मैदानाबाहेरही झगडावे लागते. मात्र या झगडण्यात खेळाचे किंवा देशाचे नुकसान होणार नाही याचीच काळजी मी घेतली आहे आणि अन्य खेळाडूंनीही तशी घ्यावी असे माझे मत आहे.’’
गतवर्षी पेसने न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीत भाग घेतला नव्हता. त्याबद्दल विचारले असता पेस म्हणाला, ‘‘आजपर्यंतच्या कारकिर्दीत या लढतीसह केवळ तीनदाच मी डेव्हिस लढतीत भाग घेतलेला नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या या लढतीपूर्वीच माझी वर्षभराची कार्यक्रमपत्रिका निश्चित झाली होती. अन्य दोन डेव्हिस लढतींमध्ये मी दुखापतीमुळे सहभागी झालो नव्हतो.’’
‘‘बंडखोर खेळाडूंनी ज्या मागण्या केल्या आहेत, त्याबाबत मी सोमदेवशी सविस्तर चर्चा केली आहे. मात्र याबाबत मत व्यक्त करणार नाही,’’ असे पेसने यावेळी सांगितले. तो पुढे म्हणाला, ‘‘गेले वर्षभर दुहेरीत मी अनेक खेळाडूंसमवेत खेळलो आहे. मात्र डेव्हिस संघाबाबत मी कोणताही हस्तक्षेप केलेला नाही. मी कर्णधार होतो, तेव्हाही संघनिवडीबाबत मी कधीही माझे मत लादलेले नाही. संघातील सहकारी कोणतेही असले तरी त्यांना मी नेहमीच आदराने वागविले आहे. मी नेहमीच देशासाठी खेळलो आहे.’’
कोरियन संघाबाबत पेस म्हणाला, ‘‘भारतीय संघ थोडासा कमकुवत मानला जात असल्यामुळे त्यांच्यावर कोणतेही दडपण नाही. घरच्या मैदानावरही आपला संघ अन्य संघांच्या तुलनेत दुबळाच मानला गेला आहे. मात्र प्रत्येक वेळी भारतीय संघाने बलाढय़ संघाला कौतुकास्पद लढत दिली आहे.
संघाचे कर्णधार एस. पी. मिश्रा यांनी संघाच्या कामगिरीबाबत आत्मविश्वास व्यक्त करीत सांगितले, ‘‘कोरियाच्या तुलनेत भारतीय संघातील खेळाडू नवोदित असले तरी जिद्दीच्या जोरावर भारतीय खेळाडू विजय मिळविण्यासाठी कसोशीने प्रयत्न करतील.’’
कोरियन संघाचे न खेळणारे कर्णधार याँग ईयुआन म्हणाले, ‘‘आम्हाला भारतात विजय मिळविण्याची चांगली संधी आहे आणि ती साध्य करण्यासाठी आमचे खेळाडू उत्सुक झाले आहेत. अर्थात आम्ही भारतीय संघाविरुद्ध गाफील राहणार नाही.’’