भारतीय हॉकी संघात पी. आर. श्रीजेशनंतर गोलकिपरची महत्वाची भूमिका बजावणारा आकाश चिकटे आणि नाशिकचा बुद्धीबळपटू ग्रँडमास्टर विदीत गुजराथी यांना मुंबई क्रीडा पत्रकार संघटनेच्या सर्वोत्तम क्रीडापटूंचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. येत्या २३ ऑक्टोबर रोजी बॉम्बे जिमखान्यात सर्व क्रीडापटूंना हे पुरस्कार दिले जाणार आहेत.

यवतमाळसारख्या छोट्या शहरातून आलेला आकाश चिकटे सध्या पुण्यात वास्तव्याला आहे. २०१६ साली मलेशियात पार पडलेल्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत आकाशने चमकदार कामगिरी करत सर्वांना आपली दखल घ्यायला भाग पाडली. यानंतर आपल्या कामगिरीत सुधारणा करत आकाश सध्या भारतीय हॉकी संघाचा अविभाज्य भाग बनला आहे. २२ वर्षीय विदीत गुजराथीने २७०० एलो रेटींग पॉईंट्सचा टप्पा पार करत विक्रम रचला होता. विश्वनाथन आनंद, पेंटला हरिकृष्णन, कृष्णन शशिकरण यांच्यातर ही किमया साधणारा विदीत चौथा भारतीय खेळाडू ठरला आहे.

याशिवाय, मुंबईच्या आदिती धुमातकर हिला सर्वोत्तम महिला क्रीडापटू तर पुण्याचा ग्रँडमास्टर अभिमन्यू पुराणिक सर्वोत्तम ज्युनिअर क्रीडापटू पुरस्काराचा मानकरी ठरला आहे. तर कॅरमपटू प्रशांत मोरे, भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू केदार जाधव यांनाही क्रीडा संघटनेच्या पुरस्कारांनी गौरवण्यात येणार आहे.

मुंबई क्रीडा पत्रकार संघटनेच्या वार्षिक पुरस्कारांच्या विजेत्यांची यादी –

१. सर्वोत्तम क्रीडापटू – विदीत गुजराथी (बुद्धिबळ, नाशिक), आकाश चिकटे (हॉकी, पुणे)

२. सर्वोत्तम महिला क्रीडापटू – आदिती धुमातकर (जलतरण, मुंबई)

३. सर्वोत्तम ज्युनिअर क्रीडापटू – अभिमन्यू पुराणिक (बुद्धिबळ, पुणे)

४. सर्वोत्तम ज्युनिअर महिला क्रीडापटू – रायना सलधाना (जलतरण, मुंबई), दिव्या चितळे (टेबल टेनिस, मुंबई)

५. सर्वोत्तम क्रीडापटू, भारतीय खेळ – प्रशांत मोरे (कॅरम, मुंबई)

६. सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू – केदार जाधव

७. सर्वोत्कृष्ट रणजीपटू – अभिषेक नायर (मुंबई)

८. सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटू – स्मृती मंधाना (सांगली)

९. सर्वोत्कृष्ट ज्युनिअर क्रिकेटपटू – पृथ्वी शॉ (मुंबई)

१०. सर्वोत्कृष्ट संघ – मुंबई इंडियन्स

११. सर्वोत्कृष्ट सांघिक कामगिरी – मुंबई सीटी एफसी

१२. सर्वोत्कृष्ट महाविद्यालय – रिझवी कॉलेज, मुंबई

१३. सर्वोत्कृष्ट शाळा – डॉन बॉस्को हायस्कुल, माटुंगा