एकीकडे आशियाई हॉकीत भारतीय वर्चस्वाला प्रथमच पाकिस्तानकडून पराभवाचा तडाखा बसत असताना दुसरीकडे मराठी मल्लांकडून त्याची भरपाई होत होती. मारुती माने व गणपत आंदळकर सुवर्णपदकांवर झेपावत होते. एकेक सुवर्णासह एकेक रौप्य पदकही पटकावत होते. भारतीय खात्यात चार पदकं जमा करत k06होते. प्रामुख्यानं पश्चिम महाराष्ट्रात व ग्रामीण महाराष्ट्रात चैतन्याच्या व उमेदीच्या लाटा उसळू लागल्या होत्या. १९६२ च्या जाकार्ता-एशियाडच्या आठवणी आजही आनंद देतात. पण त्या व्यापक आनंदात दडलंय एक छोटं व्यावसायिक सुख. आणि तिथेच जोडले गेले वसंत भालेकरांशी स्नेहसंबंध.
आठवलं की आजही आश्चर्य वाटून जातं. पीटीआय, यूएनआय अशा राष्ट्रीय वृत्तसंस्थांनी दिलेली ती बातमी बरीचशी खास, एक्सक्लुझिव्ह ठरून गेली होती. खेळांसाठी हक्काचं, स्वतंत्र दैनंदिन पान. त्याचं मोठं अप्रूप व बोलबाला. त्या लौकिकात भर टाकून गेली, एशियाड कुस्तीतील मराठी जोडीच्या सोनेरी कामगिरीची ठसठशीत बातमी.
मराठी क्रीडा क्षेत्रासाठी ऐतिहासिक महत्त्वाची ती बातमी सजवण्यास, तपशीलवार देण्यास पहाटेचे दोन वाजले. वृत्तसंपादक दि. वि. गोखले उशिरापर्यंत थांबले, कारण खेळ व क्रीडा विभाग हे त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय होते. पण वसंत भालेकरांची गोष्ट वेगळी होती. त्यांच्या कामाचं स्वरूप अर्धवेळ होतं. रात्री आठ-साडेआठनंतर दोन-अडीच तास, नौदलातील नोकरी सांभाळून माफक मानधनावर आठवडय़ातून पाच दिवस ते एवढय़ाच वेळापुरते बांधलेले होते. पण व्यावसायिक निष्ठा व कुस्ती-कबड्डीविषयीची प्रामाणिक आत्मीयता त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. घडय़ाळावर एक डोळा ठेवून काम करणं त्यांच्या स्वभावात होतंच कुठे?
वाद कर्मठ बुजुर्गाशी
कुस्तीतील त्या बातमीस पाश्र्वभूमी होती मुंबईतील एका वादाची. माने-आंदळकर-खंचनाळे आदी सारे पैलवान हौशी नाहीत, आणि व्यावसायिक आहेत; पैसे (इनाम) मिळवण्यासाठी  खेळणारे हे व्यावसायिक खेळाडू, ऑलिम्पिक-आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये उतरण्यास अपात्र आहेत, अशी भूमिका काही कर्मठ बुजुर्गानी घेतली होती. त्यासाठी न्यायालयापर्यंत त्यांनी धाव घेतलेली होती. या निवडीवर त्या वादाचं सावट पडलेलं होतं. संपादक द्वा. भ. कर्णिकांनी माझं मत विचारलं होतं. जगात पूर्णपणे हौशी खेळाडू कमीच आणि इतर सर्व क्षेत्रांप्रमाणे खेळातही, व्यावसायिक कौशल्यावर पैसे मिळवण्यात काहीच गैर असू शकत नाही. खुराकाचा, घर चालवण्याचा खर्च व आगामी आयुष्याची बेगमी करण्याची तरतूद ज्याची त्यानं केलीच पाहिजे. अमेरिकेतील अ‍ॅव्हरी ब्रूंडेज प्रभृतींचा अमॅच्युरिझमचा हट्टाग्रह पूर्णपणे कालबाह्य़ ठरलाय, असं मी संपादकांना सांगितलं. भालेकरांचंही मत वेगळं नव्हतं. मग आम्ही पैलवानांच्या याशोगाथेचे किस्से देत राहिलो. मॅटवरील ऑलिम्पिक-कुस्तीचं तंत्र मराठी मल्लांनी आत्मसात करावं, असं ठामपणे सातत्यानं मांडत राहिलो. त्यासाठी भालेकरांनी लेखणी भरपूर झिजवली.
नारायण नावडे व शांताराम तावडे यांच्या जनता केंद्रामुळे नावाजलेल्या ताडदेवच्या तुळशीवाडीत आर्य सेवा मंडळ संस्थेची जडणघडण भालेकरांनी केली. मध्यमवर्गातील भालेकरांना कॉलेजचे शिक्षण घेता आलं नव्हतं, पण त्यामुळे त्यांनी प्रगती खुंटू दिली नाही. अप्पा सामंत यांचे ‘क्रीडाविश्व’ नियतकालिक आणि सो. शं. प्रभू व हरिभाऊ दामले या सेवाभावी कार्यकर्त्यांचे मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ यात ते सक्रिय बनले. जनसंपर्क क्षेत्रातील यशवंत पवार यांच्यामार्फत कबड्डीपटूंच्या परिचयवजा लेखमाला त्यांनी लिहिल्या. नासिकच्या ‘रसरंग’ साप्ताहिकानं त्यांच्यातील सिने-लेखकास व्यासपीठ दिलं. कुस्ती-कबड्डीपेक्षाही मराठी सिनेसृष्टीत त्यांनी नावलौकिक मिळवला. वसंतराव देसाई, दादा कोंडके व विशेष म्हणजे लता मंगेशकर यांनी त्यांना आपल्या घरातला माणूस मानावं, ही गोष्ट कित्येक सरकारी पुरस्कारांपेक्षा सन्मानाची!
‘महाराष्ट्र टाइम्स’च्या क्रीडा विभागात १९६२पासून किमान २५ वर्षे आणि त्यानंतर काल-परवापर्यंत वसंतरावांची मैत्री मला लाभली. कचेरीच्या कामातील सुखदु:खे आम्ही एकमेकांशी बोलत राहिलो. रात्री ११नंतर काम संपल्यानंतर आम्ही शे-पन्नास वेळा तरी, बोरीबंदरपासून भायखळ्याच्या जे. जे. हॉस्पिटलपर्यंत चालत-बोलत जायचो.
रात्री आठ, साडेआठ ते साडेदहा-अकरापर्यंत आठवडय़ातून पाच दिवसांचे काम. व्यावसायिक क्रीडा-पत्रकारितेची जेमतेम सुरुवात होत होती. वर्तमानपत्र सहा ते आठ पानांचे. पूर्णवेळाचे संपादक एक, मग दोन. सदराची जागा चार कॉलम. अशा परिस्थितीत अर्धवेळ काम करणाऱ्यांच्या योगदानाचा हिशोब कुणी, कसा मागावा? व्यवस्थापन व संपादक यांच्या लेखी, क्रीडा हा विषय क्षुल्लक होता. जीवन-संघर्ष एवढा की, कॉलेज शिक्षण होण्याआधी नोकरीला जुंपलं जाणं, कुटुंबाच्या दृष्टीनं आवश्यक. अशा परिस्थितीत लहानाचे मोठे झालेल्या भालेकरांचे कार्यक्षेत्र मुंबईतील कबड्डी-कुस्तीपलीकडे झेपावण्याची स्वप्नंही बघू शकलं नाही. तरीही ते सदैव हसतमुख व उत्साही असत. या उमद्या वृत्तीमुळेच अमरहिंद मंडळासारख्या प्रतिष्ठित संस्थेनं अध्यक्षपदासाठी त्यांची निवड केली. मराठी क्रीडा पत्रकारितेच्या बाल्यावस्थेत त्यांनीही आपली भूमिका बजावली. त्या पायवाटेवरून आपल्याला फार मोठा पल्ला गाठायचाय, मराठी व इंग्रजी क्रीडा-पत्रकारितेतील फार मोठी दरी नष्ट करायचीय, ही जाणीव नवनव्या क्रीडा पत्रकारांनी ठेवली पाहिजे. तीच भालेकरांना खरी श्रद्धांजली ठरेल.