खेळाडूंना देण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधांचा दर्जा सुधारा असे स्पष्ट निर्देश केंद्रीय क्रीडा मंत्री विजय गोएल यांनी भारतीय क्रीडा प्राधिकरणाला (साइ) दिले. साइतर्फे देण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधांची पाहणी केल्यानंतर गोएल यांनी हे आदेश दिले. याव्यतिरिक्त साइतर्फे नियुक्त होणाऱ्या प्रशिक्षकांच्या कामाचा आढावा घेण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

काही दिवसांपूर्वी गोएल यांनी रायपूर येथील साइ केंद्राला भेट दिली. या केंद्राचा उपयोग सामाजिक कार्यक्रमांसाठी स्थानिक नगरपरिषद करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. ‘रायपूर साइ केंद्र राज्य सरकारच्या एका स्टेडियममध्ये आहे. नगरपालिका लग्न तसेच अन्य कार्यक्रमांसाठी हे स्टेडियम भाडय़ाने देते. त्यामुळे मैदान आणि सुविधा सराव करण्यायोग्य स्थितीत नाहीत. या केंद्रात प्रशिक्षक आहेत मात्र पुरेस विद्यार्थी नाहीत. फुटबॉल प्रशिक्षकाकडे ११ खेळाडूही नसतील तर दोन संघ निर्माण होऊ शकत नाहीत. अशा परिस्थतीत कसे खेळाडू घडणार?  असा सवाल गोएल यांनी केला.

ते पुढे म्हणाले, ‘प्रशिक्षकांच्या कामगिरीचा आढावा घ्यावा लागेल. आधुनिक तंत्रज्ञानाचा ते उपयोग करतात याकडे लक्ष द्यावे लागेल. ते स्वत: तंदुरुस्त आहेत का याची तपासणी केली जाईल’.

मणिपूरप्रमाणेच मध्य प्रदेशातील ग्वालियर येथे क्रीडा विद्यापीठ उभारण्याचा मानस असल्याचे गोएल यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘गेल्या वर्षभरात क्रीडापटू घडवणाऱ्या असंख्य संस्थांना भेटी दिल्या. क्रीडा विद्यापीठासाठी आवश्यक सोयीसुविधा ग्वालियर येथे उपलब्ध आहेत’.

उत्तेजक सेवन करणाऱ्या क्रीडापटूंच्या आंतरराष्ट्रीय यादीत भारत तिसऱ्या स्थानी आहे. त्यासंदर्भात विचारले असता गोएल म्हणाले, ‘वापर कमी करण्यासाठी काय उपाययोजना आहेत असे विचारले असता गोएल म्हणाले, ‘उत्तेजक सेवन फौजदारी गुन्हा करण्याबाबत विचार सुरू आहे. गैरप्रकाराला खेळात काहीही स्थान नाही’.